वेरूळच्या अद्भुत लेणीपाहून नाना पाटेकर भारावले; 'सेल्फी'साठी गराडा पडल्याने काढता पाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 19:12 IST2025-11-24T19:10:00+5:302025-11-24T19:12:40+5:30
नाना पाटेकर यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी झाल्याने ३० मिनिटांतच काढता पाय

वेरूळच्या अद्भुत लेणीपाहून नाना पाटेकर भारावले; 'सेल्फी'साठी गराडा पडल्याने काढता पाय!
- सुनील घोडके
खुलताबाद: जगप्रसिद्ध वेरूळ लेणीची अद्भुत शिल्प कलाकृती पाहण्याची हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची इच्छा सोमवारी अपूर्ण राहिली. नाना पाटेकर आज दुपारी वेरूळ लेणीला भेट देण्यासाठी आले खरे, पण चाहत्यांनी सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी केलेली प्रचंड गर्दी पाहून त्यांना अवघ्या ३० मिनिटांतच लेणीतून काढता पाय घ्यावा लागला. त्यामुळे नाना पाटेकर भारावून गेले असले तरी, त्यांचे दर्शन मात्र अर्धवट राहिले.
सोमवारी सकाळी १०:३० वाजता नाना पाटेकर वेरूळ लेणी परिसरात दाखल झाले. त्यांनी थेट लेणी क्रमांक १६, म्हणजेच जगप्रसिद्ध कैलास लेणीमध्ये प्रवेश केला. गाईड कचरू जाधव यांच्याकडून ते या शिल्प कलेच्या अद्भुत नमुन्याची माहिती जाणून घेत होते. नाना पाटेकर यांनी कैलास लेणीतील कलाकृतींचे आपल्या मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणावर फोटोही घेतले. मात्र, नाना पाटेकर लेणीत असल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. बघ्यांची आणि सेल्फी काढणाऱ्या पर्यटकांची अचानक मोठी गर्दी वाढल्यामुळे नाना पाटेकर यांना निवांतपणे शिल्प बघणे शक्य झाले नाही.
'गर्दी नसताना पुन्हा येईन' - नानांचे आश्वासन
गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने नाना पाटेकर यांना केवळ ३० मिनिटांतच लेण्या पाहणे थांबवावे लागले. त्यांनी तातडीने तेथून निघत गाडीत बसून आपला मोर्चा इतर ठिकाणी वळवला. गर्दीमुळे त्यांना लवकर जावे लागले, तरीही त्यांनी गाईड कचरू जाधव यांना सांगितले की, "मी गर्दी कधी नसते, त्यावेळी निवांत येऊन नक्की लेणी बघेल."