'मी नव्हे तर पतीच माझ्या विरोधात'; शिवशक्ती सेनेच्या बांधणीसाठी करुणा मुंडेंचा राज्यभर दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 18:02 IST2022-01-18T18:00:41+5:302022-01-18T18:02:25+5:30
पक्ष वाढीसाठी राज्यभर दौरे करणार आहे. मात्र, काही हितशत्रु मला रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत.

'मी नव्हे तर पतीच माझ्या विरोधात'; शिवशक्ती सेनेच्या बांधणीसाठी करुणा मुंडेंचा राज्यभर दौरा
वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : मी नव्हे तर पतीच माझ्या विरोधात आहेत, असे मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा-मुंडे यांनी मंगळवारी (दि.१८) वाळूजमहानगरात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आपले शिवशक्ती सेना पक्ष बांधणीसाठी राज्यभर दौरे सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे या बैठकीनिमित्त औरंगाबादेत आल्या होत्या. मात्र या बैठकीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने त्यांनी वाळूजमहानगरातील एका हॉटेलात पत्रकार परिषद घेऊन भुमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, मी शिवशक्ती सेना पक्ष काढला असून या पक्षांच्या माध्यमातुन महिला, शेतकरी, उसतोड कामगार यांचे प्रश्न सोडविण्यात येतील. पक्ष वाढीसाठी राज्यभर दौरे करणार आहे. मात्र, काही हितशत्रु मला रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यातील घराणेशाही संपवून राजकारणात वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यातील महिलावरील अत्याचारात वाढ होत चालली असून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाकडे राज्यशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सचिन डोईफोडे, भारत भोसले, विद्या अभंग, रवी गवळी, आदींची पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.
शरद पवारांची भेट झाली नाही
आपण २५ वर्षानंतर घराबाहेर पडल्याचे सांगत करूणा मुंडे म्हणाल्या, मेरी लडाई किसीसे नही मै, मै अपने पती के खिलाफ नही हुँ. बल्की पतीही मेरे खिलाफ है. मी कोणत्याही पक्षासोबत हातमिळवणी केलेली नसून माझी लढाई अन्याय-अत्याचाराच्या विरोधात आहे. कौटुंबिक कलहातुन मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भेट झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. पंकजा मुंडेविषयी बोलण्याचे त्यांनी टाळले.