छत्रपती संभाजीनगरच्या ओॲसिस चौकाजवळ चाकूने खून; आरोपींचा पोलिसावर हल्ल्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 20:01 IST2026-01-06T20:00:58+5:302026-01-06T20:01:06+5:30
चार आरोपी फरार : तिरंगा चौक ते ए एस क्लब रस्त्यावरील घटना

छत्रपती संभाजीनगरच्या ओॲसिस चौकाजवळ चाकूने खून; आरोपींचा पोलिसावर हल्ल्याचा प्रयत्न
वाळूज महानगर : ओॲसिस चौक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अब्बास पेट्रोल पंपासमोर एका तरुणाची रविवारी रात्री चाकूने भोसकून निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यादरम्यान कमळापूर येथील तब्लिगी इज्तेमा बंदोबस्त आटोपून घरी परतणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या या मारहाणीत हस्तक्षेप केल्यावर आरोपींनी थेट पोलिसावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.
एमआयडीसी वाळूज ठाण्याचे हवालदार चाँद सय्यद सय्यद गुलाब हे रविवारी कमळापूर येथे तब्लिगी इज्तेमा बंदोबस्तावरून घरी परतत होते. रात्री १०:४० वाजेच्या सुमारास तीसगाव शिवारात चार तरुण एका इसमास बेदम मारहाण करीत असल्याचे त्यांना दिसले. सय्यद यांनी वाहन थांबवले. त्यावेळी आरोपी दोन दुचाकींवर पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यांनी आरोपींच्या वाहनाचा फोटो काढण्याचा प्रयत्न करताच, आरोपींनी पोलिसावरच हल्ला करण्याच्या उद्देशाने धाव घेतली. याचवेळी फौजदार सलीम शेख तेथे आले. ते पाहताच आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. घटनास्थळी एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडलेला होता. त्याच्या छातीवर व गळ्यावर चाकूने जबर वार करण्यात आले होते. तत्काळ १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमीस घाटीत नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, दुचाकींचा तपशील व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू आहे. या निर्घृण हत्येमुळे वाळूज औद्योगिक परिसरात खळबळ उडाली आहे. रात्रीच्या वेळी वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.
मयताची ओळख पटली
सुरुवातीला मृत तरुणाची ओळख पटली नव्हती. मात्र, एमआयडीसी वाळूज पोलिसांनी मृताचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित केले. हे फोटो पाहून नायगाव-बकवालनगर (ता. जोगेश्वरी) येथील नागरिकांनी ओळख पटवली. मृताचे नाव अमोल एकनाथ बारे (वय अंदाजे ३०), असे असून, तो शेतमजुरीचे काम करीत होता, अशी माहिती तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक नरेश ठाकरे यांनी दिली. हवालदार चाँद सय्यद यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.