मनपाने आश्वासन पाळले नाही, आता १० कोटी भरा; अन्यथा छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:40 IST2025-04-24T16:35:54+5:302025-04-24T16:40:02+5:30
जलसंपदा विभागाची मनपाला नोटीस : आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने मनपाकडून पाणीबिलाचा नियमित भरणा केला जात नाही.

मनपाने आश्वासन पाळले नाही, आता १० कोटी भरा; अन्यथा छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा बंद
छत्रपती संभाजीनगर : शहराचा पाणीपुरवठा खंडित करू नये, यासाठी ३१ मार्चपूर्वी दीड कोटी रुपये भरतो, हे आश्वासन मनपा आयुक्तांनी पाळले नाही. यामुळे संतप्त झालेल्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता महापालिकेला नव्याने नोटीस बजावून १० कोटी रुपये २५ एप्रिलपर्यंत भरा, अन्यथा २८ एप्रिलपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.
जायकवाडी प्रकल्पातून जुन्या आणि नवीन पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला रोज १४० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. या पाणीवापरासाठी जलसंपदा विभागाकडून महापालिकेला दरवर्षी सुमारे ७ कोटी रुपयांचे बिल देण्यात येते. मात्र, आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने मनपाकडून पाणीबिलाचा नियमित भरणा केला जात नाही. परिणामी, पाटबंधारे विभागाचे महापालिकेकडे तब्बल ५२ कोटी ४१ लाख रुपयांची पाणीपट्टी थकबाकी आहे. ३१ मार्चच्या पार्श्वभूमीवर मनपाने किमान सहा कोटी रुपयांचा भरणा करावा, यासाठी जायकवाडी पाटबंधारे विभागाने मनपा आयुक्तांकडे पाठपुरावा केला. पाणीपुरवठा खंडित करण्याच्या नोटिसाही बजावल्या. २४ फेब्रुवारी रोजी मनपा आयुक्तांसोबत बैठक झाल्यानंतर मनपाने साडेचार कोटी रुपये दिले.
३१ मार्चला काही दिवस उरले असताना पाटबंधारे विभागाचे मुख्य प्रशासक तथा मुख्य अभियंता जयंत गवळी यांनी मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्याशी उर्वरित पाणीपट्टीसंदर्भात चर्चा केली होती. तेव्हा आयुक्तांनी त्यांना मार्चअखेरपर्यत दीड कोटी रुपये देतो, असे आश्वासन दिले होते. यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला नाही. मात्र, आता एप्रिलचा तिसरा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी मनपाने दीड कोटी दिले नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी मनपाला नव्याने नोटीस बजावून गत वर्षातील ३ कोटी, तसेच चालू वर्षाचे ७ कोटी असे एकूण १० कोटी रुपये २५ एप्रिलपर्यंत एकरकमी अदा करावेत, अन्यथा शहराचा पाणीपुरवठा २८ एप्रिलपासून बंद करण्याचा इशारा दिला आहे.
पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार
मनपाने आम्हाला आश्वासन देऊनही पाणीपट्टीची थकबाकी दिली नाही. यामुळे आता नव्याने नोटीस बजावून २५ एप्रिलपर्यंत १० कोटींचा भरणा करण्याचे सांगण्यात आले आहे. वेळेत रक्कम जमा न केल्यास २८ एप्रिलपासून छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
- दीपक डोंगरे, सहायक अधीक्षक अभियंता