मुलीला स्थळ पाहण्यासाठी निघालेल्या आईचा अपघातात मृत्यू, वडील आणि मुलगी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 16:00 IST2022-06-19T15:59:19+5:302022-06-19T16:00:17+5:30
भरधाव कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून धडकली.

मुलीला स्थळ पाहण्यासाठी निघालेल्या आईचा अपघातात मृत्यू, वडील आणि मुलगी गंभीर जखमी
औरंगाबाद: मुलीला स्थळ पाहण्यासाठी निघालेल्या देशमुख कुटुंबियांच्या कारला अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जालना-मंठा मार्गावरील वाई फाटा येथे घडली आहे. यात वडील व मुलगी गंभीर जखमी झाले असून, आई ठार झाली आहे. हेमा सुनील देशमुख(45) असे मयत महिलेचे नाव आहे. तर सुनिल वामनराव देशमुख(50) व भावना सुनील देशमुख (25 सर्व रा. नांदेड) हे गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुलीला स्थळ पाहण्यासाठी सुनील देशमुख हे रविवारी सकाळी पत्नी व मुलीसह औरंगाबादकडे कार क्रमांक (एमएच.26.बी.सी.1456)ने येत होते. 12 वाजेच्या सुमारास जालना-मंठा मार्गावरील वाई फाटा येथे ट्रक क्रमांक (एमएच.15.ईजी.4323) याचे टायर फुटल्याने रस्त्यावर उभे होते. तेवढ्यात सुनील देशमुख यांची कार ट्रकला पाठीमागून धडकली. यात सुनील देशमुख, पत्नी हेमा, मुलगी भावना हे तिघेही गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने वाटूर फाटा येथील आरोग्य केंद्रात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून हेमा देशमुख यांना मयत घोषित केले आहे. तर सुनील देशमुख व भावना देशमुख यांना पुढील उपचारासाठी जालना येथे रेफर करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी नंतर वाहतूक सुरळीत केली.