पैशाअभावी मुलाची मृत्यूशी झुंज!

By Admin | Updated: September 17, 2014 01:16 IST2014-09-17T01:00:48+5:302014-09-17T01:16:12+5:30

औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीमध्ये एका छोट्याशा कंपनीत नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या एका कामगाराच्या मुलाला ब्रेन हॅमरेज झाल्याने तो मृत्यूशी झंूज देत आहे.

Money-starved child's battle with death! | पैशाअभावी मुलाची मृत्यूशी झुंज!

पैशाअभावी मुलाची मृत्यूशी झुंज!


औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीमध्ये एका छोट्याशा कंपनीत नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या एका कामगाराच्या मुलाला ब्रेन हॅमरेज झाल्याने तो मृत्यूशी झंूज देत आहे. त्याच्यावर औषधोपचार करण्यासाठी डॉक्टरांनी तब्बल १२ लाख ७० हजार रुपये खर्च सांगितला आहे. त्यामुळे कामगार कुटुंबाच्या पायाखालची वाळूच घसरली आहे.
बीड बायपास रोडवरील अरुणोदय कॉलनीत राहणारे सुशील सरदेशपांडे यांना दोन अपत्ये आहेत. मोठा मुलगा सुमित (१३) स.भु. प्रशालेत इयत्ता सातवीमध्ये शिकतो. लहान मुलगी (९) इयत्ता चौथीत शिकत आहे. छोट्याशा नोकरीत सरदेशपांडे कुटुंब आनंदाने जगत असताना २८ आॅगस्ट रोजी कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली.
सुमित शाळेत खेळत असताना अचानक बेशुद्ध झाला. शिक्षिका उपाध्याय यांनी त्याचे वडील सुशील सरदेशपांडे यांना फोन लावला अन् सांगितले की, तुमचा मुलगा कसातरीच करतोय! तेव्हा त्यांनी मी पुण्यात आहे. चक्कर आली असेल, असे सांगून फोन ठेवला. पुन्हा उपाध्याय यांनी फोन केला की, तुमचा मुलगा गंभीर आहे. मग त्यांनी त्याला तातडीने दवाखान्यात नेण्याची विनंती केली. शाळेच्या शिक्षकांनी सुमितला साई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. नंतर त्याला एमजीएममध्ये हलविण्यात आले. तेथेही औषधोपचार होत नसल्याने सिग्मा हॉस्पिटलला नेण्यात आले.
डॉक्टरांनी विविध तपासण्या केल्यावर ब्रेन हॅमरेज झाल्याचे सांगितले. त्याच्या डोक्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असून, भविष्यात पुन्हा रक्तस्राव होऊ नये म्हणून युरोपमधून काही औषधे मागवायची आहेत. त्यासाठी डॉक्टरांनी १२ लाख ७० हजार रुपयांचा खर्च सांगितला आहे. सुमित सध्या घरी असून, वडिलांनी मोठ्या मुश्किलीने २ लाख ७० हजार रुपये खर्च केले आहेत. शहरातील दानशूर मंडळींनी त्याच्या उपचारासाठी आर्थिक साह्य करावे, असे आवाहन त्याच्या वडिलांनी केले आहे. दानशूर मंडळींनी सिग्मा हॉस्पिटल येथे सुमित सरदेशपांडे या नावाने आर्थिक साह्य जमा करावे.

Web Title: Money-starved child's battle with death!