'आई, पोहोचल्यावर सांग, मी येतो', फोननंतर पहाटे तिचा मृतदेहच पाहण्याची मुलावर आली वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 19:10 IST2025-11-20T19:08:38+5:302025-11-20T19:10:31+5:30
एका मैत्रिणीवर अंत्यसंस्कार सुरू असताना दुसऱ्या मैत्रिणीची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आली; हुंदके, आक्रोशाने वाळूज हळहळले

'आई, पोहोचल्यावर सांग, मी येतो', फोननंतर पहाटे तिचा मृतदेहच पाहण्याची मुलावर आली वेळ!
छत्रपती संभाजीनगर : मंगळवारी दुपारी सिहोर येथे दर्शन झाल्यानंतर लता राजू परदेशी (४७), आशा राजू चव्हाण (४०, दोघी रा. वाळूज) दोघींनी मुलांना कॉल करून दर्शन चांगले झाल्याचे कळवले. रात्री ९ वाजता रेल्वे एका थांब्यावर असताना आशा यांनी मोठा मुलगा पवनला कॉल करून त्याला वडील, लहान भावासह जेवणाविषयी विचारपूस केली. पवनने आईला 'शहरात पोहोचल्यावर कॉल कर, मी तुला घ्यायला येतो', असे सांगितले होते. पहाटे उठून घ्यायला जाण्याच्या तयारीत तो होता. मात्र ५ वाजता आईच्या अपघाताचा काॅल आला. थरथरणाऱ्या अंगाने पवन घाटीत दाखल झाला. तेव्हा आठ तासांपूर्वी आनंदाने बोललेल्या आईचा मृतदेह पाहण्याची वेळ त्याच्यावर आली. त्याच्या आक्रोशाने घाटीतील उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले होते.
बेजबाबदार ट्रॅव्हल्सचालक व त्याच्या सहकाऱ्याच्या एका चुकीमुळे उत्साहात दर्शन करून शहरात परतलेल्या आशा व लता यांच्यावर काळाने घाला घातला. वाळूज व नगर नाक्यावर प्रवाशांना उतरविल्यानंतरही चालक चेन्नवरी श्रीकांत गुवे (२९, रा. बिदर, कर्नाटक) व क्लिनर राज सुनील बैरागी (२०, रा. मध्यप्रदेश) यांनी डिक्कीचा दरवाजा उघडा असल्याचे पाहिले कसे नाही, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. तो बऱ्याच अंतरापासून तसाच उघडा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. मात्र, पहाटेची वेळ असल्याने तो दरवाजा अन्य वाहनाला धडकला नाही. पंचवटी चौक सारख्या छोट्या रस्त्यावरही चालक सुसाट वेगात जाताना तो रिक्षाला लागून अपघात झाला.
दोन कुटुंब आईच्या मायेपासून पोरकी
आशा यांचे पती चालक आहेत. त्यांचा लहान मुलगा दहावीत असून मोठा मुलगा पवन महाविद्यालयीन शिक्षण घेतो. तर परदेशी यांच्या पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांची मोठी मुलगी विवाहित असून २९ वर्षांच्या मुलाचे वाळूजमध्ये वेल्डिंग वर्कशॉप आहे. चार वर्षांच्या अंतराने आई-वडील दोघांच्या प्रेमाला तो पारखा झाला. घाटीत दोघींच्या मुलांच्या आक्रोशाने सर्वच हळहळले.
एकीवर अंत्यसंस्कार, दुसरीची अंत्ययात्रा आली
एकाच परिसरात राहत असल्याने आशा, लता दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या. दोघींवर बुधवारी सायंकाळी वाळूज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. लता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच आशा यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत दाखल झाली. त्यावेळी दोघांच्या कुटुंबाचे हुंदके, आक्रोशाने संपूर्ण वाळूज परिसर हळहळला.