दूध बंद, पाण्याचा रतीब सुरू !

By Admin | Updated: February 9, 2016 00:30 IST2016-02-08T23:57:58+5:302016-02-09T00:30:46+5:30

टीम लोकमत , बीड खेडी अन् पाणीटंचाई हे काही नवे चित्र नाही; परंतु पाण्यासारखा पैसा ओतून पाच पाणी योजना राबविल्या तरी महिलांच्या डोक्यावरील हंडा काही हटला नाही.

Off the milk, the water system starts! | दूध बंद, पाण्याचा रतीब सुरू !

दूध बंद, पाण्याचा रतीब सुरू !


टीम लोकमत , बीड
खेडी अन् पाणीटंचाई हे काही नवे चित्र नाही; परंतु पाण्यासारखा पैसा ओतून पाच पाणी योजना राबविल्या तरी महिलांच्या डोक्यावरील हंडा काही हटला नाही... गावात जेवढ्या गल्ल्या, मोहल्ले... त्या सर्वांना स्वतंत्र हातपंप... त्यांची संख्या दोन डझनवर; पण ठणठणाट कायमच...! एकवेळ दुधाशिवाय निभावता येईल; परंतु पाणी मिळाले नाही तर जगायचे कसे, हा यक्षप्रश्न! त्यामुळे दूध बंद करून पाण्याचा रतीब लावण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. ‘लोकमत’च्या ‘स्पॉट रिपोर्टिंग’ मध्ये मादळमोहीकरांनी समस्यांचा पाढाच वाचला.
मादळमोही हे जि.प. गटाचे गाव उपबाजारपेठेमुळे तालुक्यात प्रसिद्ध आहे. गावात मोहिमातेचे पुरातन मंदिर आहे. कल्याण - विशाखापट्टणम महामार्ग गावातून गेल्याने उपबाजारपेठेने बाळसे धरले आहे. १३ हजार लोकसंख्येच्या या गावात फेब्रुवारीमध्येच पाणी टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. गावातील सार्वजनिक विहिरी, हातपंप, विद्युतपंप यापैकी कशालाही पाणी नाही. पारंपरिक आडही आटले आहेत. पाण्याचे मुख्य स्रोत उसासे टाकत असल्यामुळे पाण्यासाठी रानोमाळ पायपीट करण्याशिवाय नागरिकांना पर्यायच उरला नाही. ज्याच्याकडे थोडेफार पाणी आहे, त्याने टंचाईच्या परिस्थितीचा फायदा घेत पाण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. ५०० लिटर पाण्यासाठी १०० रुपये दर ठरलेला आहे. गावातील जवळपास १ हजार पशुधनालाही पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत. रामजी भुजबळ, राजाभाऊ झिंगरे, किसन कातोळे, डॉ. शहाजी शेळके आदींनी ‘लोकमत’जवळ समस्या आणि अपेक्षा मांडल्या.
पाण्याचे मोल काय असते याची प्रचिती गावात गेल्यावरच कळते. ज्याला त्याला पाण्याचीच चिंता. कुणी बैलगाडीतून, कुणी वाहनातून, तर काही जण दुचाकीवरून पाणी वाहताना दिसतात. ‘साहेब, पाण्याचं विचारू नका. दुधाचा रतीब बंद केला अन् पाण्याचा लावला’, अशा शब्दांत काठी टेकवत आलेल्या वृद्धाने आपली वेदना व्यक्त केली. दिवस उगवला की, सारी कामे सोडून पाण्याची व्यवस्था करावी लागते, असे गणेश तळेकर म्हणाले.
मुरली खंडागळे म्हणाले, आतापर्यंत अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले, दुष्काळही जवळून पाहिला; पण एवढी वाईट परिस्थिती कधी आली नव्हती. गयाबाई तळेकर म्हणाल्या, सारा वेळ पाण्याची तजवीज करताना घरातील कामे बाजूला पडतात.
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६ उपकेंद्रे येतात. ३९ गावांचे कार्यक्षेत्र या आरोग्य केंद्रांतर्गत येते. केवळ एकच वैद्यकीय अधिकारी असून इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तसेच रूग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. येथील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहण्यास उदासीन आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. पिण्याच्या पाण्याचीही गंभीर समस्या असून झाडेही वाळलेले आहेत. आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी २ कोटी रूपयाचा निधी मंजूर झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.टी.लांजेवार यांनी सांगितले.

Web Title: Off the milk, the water system starts!