'मर्द को भी दर्द होता है!' रडणं, बोलणं, व्यक्त होणं; कमजोरी नसून जगण्याची पहिली पायरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:55 IST2025-11-19T15:53:52+5:302025-11-19T15:55:52+5:30
जागतिक पुरुष दिन: पुरुषांना 'मजबूत' नव्हे, 'भावनांनी समृद्ध' होण्याचा अधिकार आहे

'मर्द को भी दर्द होता है!' रडणं, बोलणं, व्यक्त होणं; कमजोरी नसून जगण्याची पहिली पायरी!
- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर : ‘पुरुष कणखर असतो, तो रडत नाही’...घराघरांत वर्षानुवर्षे बोलले व कानी पडणारे हे वाक्य. पण, या एका वाक्यामुळे निर्माण झालेले भावनिक वादळ, न व्यक्त झालेले दुःख आणि कमजोर ठरण्याची भीती पुरुषांना आतून पोखरत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ सांगत आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये पुरुषांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. ‘जागतिक पुरुष दिना’च्या पार्श्वभूमीवर ‘मर्द को भी दर्द होता है’ हे सांगत आहेत मानसोपसार तज्ज्ञ.
आपल्या सभोवताली असलेला एखादा पुरुष रडला तर तुमची काय प्रतिक्रिया असते; बऱ्याचवेळा आश्चर्याची. पुरुषालाही दुःख झाले तरी तो चारचौघांमध्ये मोकळेपणाने व्यक्त होत नाही. यातूनच पुरुषांचा मानसिक कोंडमारा सुरू होतो. ताण-तणावात वाढ होते.
व्यक्त होणंच मुक्ती
स्त्री असो वा पुरुष, भावना सर्वांनाच असतात. पुरुषांनी व्यक्त झाल्याशिवाय मन मोकळे होत नाही. व्यक्त न होण्यामुळे ताण वाढतो आणि हळूहळू ते डिप्रेशनकडे ढकलले जातात. म्हणूनच पुरुषांनीही रडायला हवं, बोलायला हवं…. व्यक्त होणं हीच खरी मुक्ती आहे.
-प्रदीप देशमुख, सहयोगी प्राध्यापक, घाटी
भावनांची खोली स्त्री-पुरुषांमध्ये सारखीच
पुरुष घराचा कर्ताधर्ता. तो मजबूत असावा ही समाजाने घातलेली चौकट आहे. पण, हा कणखरपणाचा केवळ ‘मुखवटा’ असतो. भावनांची खोली स्त्री-पुरुषांमध्ये सारखीच असते. पुरुष व्यक्त होत नाही, अगदी जवळची माणसंदेखील त्याचं दुःख वाचू शकत नाहीत. न व्यक्त झालेल्या भावनांतून व्यसनाधीनता, ताण-तणाव आणि मानसिक आजार वाढतात.
-डॉ. जितेंद्र डोंगरे, मनोविकारशास्त्र विभागप्रमुख
मर्दानगीची अपेक्षा नको
पुरुषप्रधान व्यवस्था पुरुषाला रडण्याची परवानगी देत नाही. लहानपणापासून मुलांच्या मनावर हे बिंबवले जाते की ‘तू मुलगा आहेस, मुलींसारखे काय रडतोस’. जर लहानपणापासूनच मुलांना संवेदनशीलतेने वाढवले तर भविष्यात पुरुष झालेले मूल भावना व्यक्त करताना घाबरणार नाही. त्याच्याकडून मर्दानगीची अपेक्षा केली नाही तर उद्याचा तो सक्षम पुरुष ठरेल.
-मुक्ता चैतन्य, मनोविकास अभ्यासक, सायबर तज्ज्ञ
धक्कादायक आकडे
आत्महत्यांचे प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये २.५ पट जास्त
मानसिक आजारांचे प्रमाण पुरुषांमध्ये १४%, तर स्त्रियांमध्ये ८%
भावनांनी समृद्ध व्हावे
तज्ज्ञ सांगतात, पुरुषांनी स्वतःभोवती आखलेली ‘कणखरपणाची चौकट’ तोडावी. उपचार, समुपदेशन दुर्बलता नाही. पुरुषांना फक्त ‘मजबूत’ नव्हे, भावनांनी समृद्ध होण्याचा अधिकार आहे. रडणं, बोलणं, व्यक्त होणं ही कमजोरी नसून उपचाराची, जगण्याची पहिली पायरी आहे.