समृद्धी महामार्गावर ट्रकला धडकल्यानंतर ट्रॅव्हल्सला भीषण आग; एका प्रवाशाचा अंत, ३१ थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:35 IST2026-01-02T10:35:09+5:302026-01-02T10:35:51+5:30
समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक; बुलढाण्याच्या प्रवाशाचा मृत्यू.

समृद्धी महामार्गावर ट्रकला धडकल्यानंतर ट्रॅव्हल्सला भीषण आग; एका प्रवाशाचा अंत, ३१ थोडक्यात बचावले
छत्रपती संभाजीनगर:समृद्धी महामार्गावरअपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज (२ जानेवारी) पहाटे तीन वाजेच्या सुमारास माळीवाडा टोलनाक्याजवळ एका खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या धडकेनंतर मिनी बसला भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला असून अन्य प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 'साईराम ट्रॅव्हल्स'ची भारत बेंझ बस (क्रमांक MH19 CX 3015) मुंबईच्या दिशेने जात होती. पहाटे ३:०१ वाजेच्या सुमारास माळीवाडा टोलनाक्यापासून १५ ते १६ किमी अंतरावर (महामार्ग क्र. ४६३) या बसने समोरील ट्रकला (क्रमांक CG04 M 8711) जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसने तात्काळ पेट घेतला.
अग्निशमन दलाची धाव आणि बचावकार्य
घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदमपुरा आणि कांचनवाडी अग्निशमन केंद्राची पथके तात्काळ घटनास्थळी रवाना झाली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून बसला लागलेली आग आटोक्यात आणली. बसमध्ये एकूण २९ प्रवासी, २ ड्रायव्हर आणि १ कंडक्टर असे एकूण ३२ जण होते. यातील ३१ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, मात्र एका प्रवाशाचा मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
मयत प्रवाशाची ओळख: या अपघातात अमोल सुरेश शेलकर (वय ३८, रा. खामगाव, जि. बुलढाणा) यांचा मृत्यू झाला आहे.
समृद्धी महामार्ग आणि अपघातांचे सत्र
समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून यावर अपघातांचे प्रमाण चिंतेचा विषय ठरले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, महामार्ग सुरू झाल्याच्या पहिल्या वर्षातच शेकडो लहान-मोठे अपघात झाले आहेत.
- प्रमुख कारणे: हायवे हिप्नोसिस (चालकाला डुलकी लागणे), अतिवेग, टायर फुटणे आणि रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांचे आडवे येणे.
- मागील गंभीर घटना: यापूर्वी सिंदखेडराजा जवळ झालेल्या बस अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. अशा घटनांमुळे समृद्धी महामार्गाच्या सुरक्षिततेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.