फुले पुतळा ते जुना मोंढ्यापर्यंत रस्त्यासाठी मार्किंग; नवीन विकास आराखड्यात रुंदी ६० फूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:35 IST2025-10-07T15:31:21+5:302025-10-07T15:35:01+5:30
काही मालमत्ता एक ते दीड मीटर, तर काहींना ६ मीटरपर्यंत फटका बसत आहे.

फुले पुतळा ते जुना मोंढ्यापर्यंत रस्त्यासाठी मार्किंग; नवीन विकास आराखड्यात रुंदी ६० फूट
छत्रपती संभाजीनगर : मागील २ महिन्यांपासून महापालिकेने रस्ता रुंदीकरण मोहिमेला विश्रांती दिली होती. सोमवारी अचानक औरंगपुऱ्यातील महात्मा फुले पुतळा ते जुना मोंढ्यातील हरी मशीदपर्यंतच्या मालमत्तांवर मार्किंग करण्यात आली. नवीन विकास आराखड्यानुसार हा रस्ता १८ मीटर म्हणजे जवळपास ६० फूट रुंद दर्शविला आहे. सोमवारी केलेल्या मार्किंगमध्ये १०० पेक्षा अधिक मालमत्ता बाधित होत असल्याचे निदर्शनास आले. काही मालमत्ता एक ते दीड मीटर, तर काहींना ६ मीटरपर्यंत फटका बसत आहे.
गुलमंडी कॉर्नर ते जुना मोंढ्यापर्यंतचा रस्ता खूपच अरुंद आहे. या रस्त्यावर बाजारपेठेमुळे अनेकदा मोठ्या वाहनांची जास्त वर्दळ असते. त्यात अनेक व्यापारी रिक्षाने सामान मागवतात. सर्वसामान्य वाहनधारकही याच रस्त्याचा वापर करतात. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी काही महिन्यांपूर्वी रस्त्याची पाहणी केली होती. या रस्त्यावरील काही धोकादायक इमारती पाडण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. त्यानुसार अतिक्रमण हटाव विभागाने काही इमारती जमीनदोस्त केल्या. नगररचना विभागाला या रस्त्याचे टोटल स्टेशन सर्वे करून मार्किंग करावी, असेही निर्देश दिले होते. विभागाने टोटल सर्वे स्टेशन करून मालमत्ता सुपर इम्पोज केल्या. त्यानंतर सोमवारी मार्किंगचा निर्णय घेण्यात आला.
नगररचनाचे अभियंता राहुल मालखेडे आपल्या टीमसह सकाळी १०:३० वाजता महात्मा फुले चौकात दाखल झाले. तेथून गुलमंडी कॉर्नरपर्यंत बहुतांश मालमत्ता बांधकाम परवानगी घेवूनच उभारलेल्या आहेत. तेथून पुढे काही मालमत्ता मार्किंगमध्ये बाधित होत असल्याचे निदर्शनास आले. मार्किंगदरम्यान एकाच मालमत्ताधारकाकडे बांधकाम परवानगी दिसून आली. जुना मोंढा भागात एका महिलेने पथकासोबत मार्किंगच्या मुद्यावरून वाद घातला. महिलेस बांधकाम परवानगीची मागणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा विरोध मावळला.
आता पाडापाडी कधी होणार?
महापालिकेने सोमवारी महात्मा फुले पुतळा, गुलमंडी कॉर्नर, अंगुरीबाग मार्गे जुना मोंढा येथील हरी मशीदपर्यंत मार्किंग तर केली. आता प्रत्यक्षात पाडापाडी कधी करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. लवकरच दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. दिवाळीनंतर रुंदीकरणाला मुर्हूत लागू शकतो.