मराठवाड्यात अवकाळीचा हाहाकार! १९ हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 12:48 IST2026-02-26T12:47:08+5:302026-02-26T12:48:32+5:30
निसर्गाचा कोप! हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला

मराठवाड्यात अवकाळीचा हाहाकार! १९ हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान, दोघांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे १९ हजार हेक्टरवरील रबी पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार लातूरसह नांदेड, परभणी, धाराशिव, बीड जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. वीज पडून दोघांचा मृत्यू झाला, तर एकूण चार जनावरे दगावली. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी विभागातील धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणीसह नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. यात बीड, लातूरला गारपीटदेखील झाली. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.
१५ हजार ५१६ हेक्टरवरील पिके बाधित झाली असून यात ८०८ हेक्टर बागायत क्षेत्राचा देखील समावेश आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या २३ हजार १०४ असून एकूण बाधित गावांची संख्या १३६ च्या आसपास आहे. बीड जिल्ह्यातील १ हजार ४६४ हेक्टरवरील बागायत क्षेत्रासह एकूण ३ हजार ४०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात ९५ हेक्टरवरील फळपिकांचा देखील समावेश आहे, तसेच नांदेड जिल्ह्यातील ६८ हेक्टरवरील पिकांना अवकाळीमुळे तडाखा बसला.
दोन जणांचा वीज पडून मृत्यू
वीज पडून लातूर जिल्ह्यातील मौजे वायगाव (ता. उदगीर) येथील रहिवासी दिगंबर राम बेलकुंडे (वय ६०) यांचा तसेच विशाखा सचिन येलकेवाड (रा. मौजे पारडी, ता. हिमायतनगर, जि. नांदेड) या दोघांचा मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात दोन जनावरांचा, तसेच बीड व परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका अशा एकूण चार जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे.