मराठवाड्याला गारपिटीचा तडाखा; काढणीला आलेला गहू आडवा, आंब्यासह फळपिकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 20:06 IST2026-03-20T20:05:53+5:302026-03-20T20:06:35+5:30
"हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावला!"; मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह गारपीट, फळबागांचे अतोनात नुकसान

मराठवाड्याला गारपिटीचा तडाखा; काढणीला आलेला गहू आडवा, आंब्यासह फळपिकांचे नुकसान
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला १८ मार्च रोजी रात्री गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा काढणीस आलेल्या गव्हाला आणि आंब्यासह फळपिकांना बसला. शेतकऱ्यांच्या नुकसानीची परिस्थिती अद्याप समोर आलेली नाही; परंतु विभागातील काही जिल्ह्यांत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आयुक्तालयाकडे आली आहे. २२ मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
१८ मार्च ते १९ मार्च सकाळपर्यंत विभागात ५.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांसह जनसामान्यांची तारांबळ झाली. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात वीज पडून जनावरे दगावल्याचा प्राथमिक अहवाल आहे; तसेच इतर जिल्ह्यांतील नुकसानीच्या माहिती संकलन सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले. विभागातील सर्व जिल्ह्यांत अवकाळी पाऊस झाला असून, नुकसानीची माहिती एक-दोन दिवसांत समोर येईल.
दोन दिवसांत पाऊस थांबेल...
दोन दिवसांत पाऊस थांबेल, अशी परिस्थिती आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली. पिकांना याचा फटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील अवकाळी पाऊस झाला.
श्रीनिवास औंधकर, हवामान अभ्यासक
जिल्हा ............... झालेला पाऊस
संभाजीनगर .... ३.४
जालना ............... ५.१
बीड ................. ४.२
लातूर ................ ७.५
धाराशिव ............. ६.५
नांदेड ............... ७.५
परभणी ............ ८.७
हिंगोली ...............७.२
एकूण ........ ५.७ मि.मी.