मराठवाड्याला कमी पावसाचा फटका; दुबार पेरण्यांचे संकट घोंगावतेय, धरणात ३० टक्केच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 11:59 AM2022-07-06T11:59:25+5:302022-07-06T12:00:49+5:30

प्रकल्पांतील  २१ टक्के पाणी घटले : मे महिन्यात ५१ टक्के होता जलसाठा, बाष्पीभवनात वाढ

Marathwada hit by low rainfall; Crisis of double sowing is raging, only 30% water in the dam | मराठवाड्याला कमी पावसाचा फटका; दुबार पेरण्यांचे संकट घोंगावतेय, धरणात ३० टक्केच पाणी

मराठवाड्याला कमी पावसाचा फटका; दुबार पेरण्यांचे संकट घोंगावतेय, धरणात ३० टक्केच पाणी

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यातील लहान, मोठ्या व मध्यम जलप्रकल्पांना कमी पावसाचा फटका बसला आहे. मे अखेरीस ५१ टक्के जलसाठा होता. जून महिन्यात धरणांतील पाणीपातळी ४० टक्क्यांवर आली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३० टक्क्यांवर जलसाठा आला आहे. दोन महिन्यांत २१ टक्के पाणी घटले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २६ टक्क्यांनी प्रकल्पातील पाणी कमी झाले आहे. उन्हाचा पारा आणि कमी पर्जन्यमान त्यातच वाढलेल्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा कमी झाला आहे. अकरा मोठ्या प्रकल्पांतील २५.००१८ दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याची वाफ (बाष्पीभवन) झाली आहे. मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांपैकी ७ हून अधिक प्रकल्प कोरडे पडले आहेत. तर ५५ प्रकल्पांत सध्या जोत्याच्या खालीवर जलसाठा आहे. २११ प्रकल्पांत २६ टक्क्यांच्या आसपास जलसाठा आहे. गेल्या पावसाळ्यात विभागातील सगळी धरणे ओसंडली होती. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचा साठा २०२०-२१ च्या तुलनेत बऱ्यापैकी होता, मात्र तापमान वाढल्याचा व कमी पावसाचा फटका जलप्रकल्पांना बसला आहे. मागच्या वर्षी एप्रिल अखेरीस ५६ टक्क्यांच्या आसपास जलसाठा विभागात होता. मे महिन्याच्या अखेरीस ४० टक्क्यांवर धरणे होती. तर जूनअखेरीस ४१ टक्के जलसाठा धरणांमध्ये होता. या वर्षी परिस्थिती चिंताजनक आहे.

दमदार पावसाची अपेक्षा
मराठवाड्यातील जलप्रकल्पांना दमदार पावसाची अपेक्षा आहे. ६७९ मि.मी. वार्षिक पर्जन्यमान आहे. त्या तुलनेत १६४ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. या पावसामुळे धरणात मुबलक जलसाठा आलेला नाही.

जायकवाडी ५६ वरून ३३ टक्क्यांवर
जायकवाडी धरणात मे महिन्यात ५६ व जून महिन्यात ४३ टक्के पाणी होते. आता ३० टक्के आहे. मागील वर्षी ५५ टक्के जलसाठा होता. धरणातून १.८९ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. मध्यम प्रकल्पांतील जलसाठा ४५ वरून ३० टक्क्यांवर आला आहे. लघू प्रकल्पात ३१ वरून २० टक्के, गोदावरी बंधाऱ्यात ४७ वरून ३५ टक्के जलसाठा झाला आहे. इतर बंधाऱ्यांत ८९ वरून ६५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.

विभागातील प्रकल्पांतील अंदाजे जलसाठा असा
मोठे प्रकल्प - ११ - ४१.११ टक्के जलसाठा
मध्यम प्रकल्प - ७५ - ३०.०२ टक्के जलसाठा
लघू प्रकल्प - ७४९ - २०.६२ टक्के जलसाठा
गोदावरी बंधारे - १५ - ३५.४१ टक्के जलसाठा
इतर बंधारे - २५ - ६५.३८ टक्के जलसाठा
एकूण - ८७५- ३०.७७ टक्के जलसाठा

 

Web Title: Marathwada hit by low rainfall; Crisis of double sowing is raging, only 30% water in the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.