मराठा आंदोलनाचा सिनेस्टाईल थरार, सरपंचाने जाळली स्वत:ची नवी कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 15:40 IST2023-09-02T15:39:51+5:302023-09-02T15:40:09+5:30
जालन्यातील आंदोलनस्थळी जाऊन छत्रपती संभाजीराजेंनी सकाळीच आंदोलकांची भेट घेतली आणि गोळ्या घालणे चूक की बरोबर हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे, असे आव्हान दिले.

मराठा आंदोलनाचा सिनेस्टाईल थरार, सरपंचाने जाळली स्वत:ची नवी कार
संभाजीनगर - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला, गोळीबार केला. त्यामुळे राज्यभरातील वातावरण तापलेले असून अनेक ठिकाणी सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी एकत्र येत मोर्चे काढले आहेत. तर, आंदोलकांची भेट घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी आपला मोर्चो आंदोलकांकडे वळवला आहे. दुसरीकडे अनेक जिल्ह्यांत बंदची हाक देण्यात आली असून आंदोलक एकत्र येत राज्य सरकारचा निषेध नोंदवत आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात एका सरपंचाने स्वत:ची नवी गाडी जाळून घटनेचा निषेध व्यक्त केला.
जालन्यातील आंदोलनस्थळी जाऊन छत्रपती संभाजीराजेंनी सकाळीच आंदोलकांची भेट घेतली आणि गोळ्या घालणे चूक की बरोबर हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे, असे आव्हान दिले. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही काहीवेळापूर्वी मुंबईहून जालन्याला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील जालन्याला जाणार आहेत. हे दोन्ही नेते जालन्याला जात आंदोलन स्थळी आणि जखमी आंदोलकांची भेट घेणार आहेत. आंदोलनात राजकीय नेत्यांचा सहभाग वाढला असला तरी ठिकठिकाणी मराठा समाज एकत्र येत आक्रमक भूमिका घेत आहेत. संभाजीनगरमधील एका सरपंचाने स्वत:ची कार जाळून निषेध नोंदवला आहे.
विहिर मंजूर करण्यासाठी लाच मागितल्यानंतर पैशांची उधळण करणाऱ्या फुलंब्री तालुक्यातील सरपंच मंगेश साबळे यांनी आता पुन्हा एकदा हटके आंदोलन केले आहे. मंगेश साबळे यांनी वर्षभरापूर्वीच घेतलेली नवी चारचाकी पेट्रोल टाकून जाळून टाकली. मराठा आंदोकांवरील लाठीहल्ल्याचा निषेध करत करत त्यांनी फुलंब्रीतील पाल फाटा येथे ही कार जाळत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी मंगेश साबळे यांच्यासोबत काही मराठा आंदोलकही होते.
आमच्या लोकांवर हल्ला होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आता आम्ही स्वत:ची गाडी जाळली, पुढे आम्ही स्वत:ला जाळून घेऊन निषेध व्यक्त करू, ज्यांनी हा लाठीचार्ज केला त्यांच्यावर सरकारने दोन दिवसांत कारवाई करावी, अन्यथा आम्ही स्वतला जाळून घेऊ, असा इशाराही सरपंच साबळे यांनी दिला आहे.
पंचायतीसमोर उधळल्या होत्या नोटा
फुलंब्री पंचायत समितीसमोर याच सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटांचा पाऊस पाडला होता. याचा व्हीडिओ राज्यभर व्हायरल झाला होता. अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, विहिरींना मंजुऱ्या न देणे, यामुळे वैतागून आपण दोन लाख रुपयांच्या नोटा उधळल्याचं मंगेश साबळे यांनी सांगितलं होतं.