पोलिसांशी नडणारा अडकला! दोन तासात सस्पेंड करण्याची धमकी देणारा अखेर पोलीस कोठडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 22:39 IST2025-01-26T22:35:32+5:302025-01-26T22:39:00+5:30

पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटेंची कठोर भूमिका

Man who threatened to suspend police in two hours finally in police custody | पोलिसांशी नडणारा अडकला! दोन तासात सस्पेंड करण्याची धमकी देणारा अखेर पोलीस कोठडीत

पोलिसांशी नडणारा अडकला! दोन तासात सस्पेंड करण्याची धमकी देणारा अखेर पोलीस कोठडीत

छत्रपती संभाजीनगर : सुसाट वेगात व्हीआयपी सायरन वाजवत जात वाहतूक पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून सस्पेंड करण्याची धमकी देणाऱ्या कुणाल बाकलीवाल ला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. शिवाय, त्याची महागडी डिफेंडर गाडी देखील जप्त केली आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटेंनी रविवारी अधिकाऱ्यांची कानउघडणी करत सक्त कारवाईचे आदेश दिले. 

वाहतूक शाखेचे अंमलदार दैनसिंग जोनवाल हे सहायक फौजदार बागूल यांच्यासह २४ जानेवारी रोजी सायंकाळी मिल कॉर्नर सिग्नलवर कर्तव्यावर होते. यावेळी बाकलीवाल व्हीआयपी सायरन वाजवत महागड्या डिफेंडर गाडीत जात होता. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केल्याचा राग आल्याने बाकलीवाल ने चौकाच्या मधोमध गाडी (एम एच २० -जीके -१८१९) थांबवली. अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत हुज्जत घालत 'तू पहेचनता नही क्या, मै कोन हूँ, असे म्हणत बागूल यांना 'बुढ्ढे तेरेको ड्युटी करने आती क्या, माझ्या नादी लागू नको' असे म्हणत सर्वांना दोन तासांत सस्पेंड करतो, असे धमकावले.

लोकमत ने एनसी वर सर्वप्रथम घेतला आक्षेप

भर चौकात सर्वसामान्यांसमोर पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला. सर्वसामान्यांच्या बाबतीत थेट सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांनी याप्रकरणी केवळ अदखलपात्र (एनसी) दाखल केली. लोकमत ने या संदर्भात सर्वप्रथम रविवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी याची गंभीर दाखल घेत एनसी दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. 

आधी सस्पेंड ची धमकी, चोवीस तासात पोलीस कोठडीत   

मोठ्या माणसांच्या नावाने पोलीस कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्याची धमकी देणारा बाकलीवाल २४ तासात पोलीस कोठडीत होता. एनसी नंतर त्याच्यावर बीएनएस कलम १३२,३५२,३५१(२) सह मोटर वाहन कायदा १९८८ चे कलम १००(२)/१७७, ११९(२)/१७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सहायक पोलिस धनंजय पाटील, निरीक्षक सुनील माने, सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी तत्काळ बाकलीवाल ला घरातून बेड्या ठोकल्या. त्याच्यावर शिवाय, व्हीआयपी सायरन असलेली महागडी डिफेंडर गाडी देखील जप्त केली. बाकलीवालची रात्री मेडिकल तपासणी करण्यात आली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Web Title: Man who threatened to suspend police in two hours finally in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.