मनपा घर पाडणार, धास्तीने तरुणाने जीवन संपवलं; मृतदेह रस्त्यावर ठेवत नागरिकांचे रस्तारोको
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 19:20 IST2025-09-25T19:16:55+5:302025-09-25T19:20:08+5:30
'मनपाने घेतला निर्दोष बळी!' म्हणत जोपर्यंत आयुक्त येत नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार नाही, अशी आंदोलकांनी घेतली भूमिका

मनपा घर पाडणार, धास्तीने तरुणाने जीवन संपवलं; मृतदेह रस्त्यावर ठेवत नागरिकांचे रस्तारोको
छत्रपती संभाजीनगर: महापालिका प्रशासनाच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेमुळे घर जाणार असल्याच्या धास्तीने शहरातील चिखलठाणा परिसरातील राजेश्वर साईनाथ नवपुते या तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा मनपा प्रशासनाच्या 'अन्यायकारक कारभारा'मुळे गेलेला 'निर्दोष बळी' असल्याचा आरोप करत, नवपुते यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाजवळ मृतदेह ठेवून चिखलठाणा येथे रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे. यामुळे जालना रोडवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
मृत राजेश्वर नवपुते यांनी सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी आपली शेती विकून कष्टाने घर बांधले होते. मात्र, मनपा प्रशासनाने सुरू केलेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेत त्यांचे घर बाधित ठरवत मार्किंग केले. हे घर १५ ऑगस्टपर्यंत पाडण्याची अंतिम मुदत होती. आता मुदत उलटून गेल्याने कधीही मोहीम सुरू होऊन वडिलोपार्जित घर पडणार या विचाराने ते प्रचंड धास्तावले होते. याच धास्तीमुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी केंब्रिज चौकात भाड्याने घर घेतले होते. दूध विक्रीचा व्यवसाय करणारे राजेश्वर नवपुते आज (बुधवार) सकाळी दूध विकून घरी आले आणि त्यांनी गळफास लावून जीवन संपवले. त्यांच्या पश्चात अवघे चार महिन्यांचे बाळ आणि पत्नी असा परिवार आहे.
'आयुक्त आल्याशिवाय अंत्यसंस्कार नाही'
नवपुते यांच्या आत्महत्येची बातमी मिळताच नातेवाईक आणि संतप्त नागरिकांनी त्यांच्या मृत्यूसाठी मनपा प्रशासनाला जबाबदार धरले आहे. त्यांनी राजेश्वर यांचा मृतदेह घेऊन चिखलठाणा येथील जिल्हा रुग्णालयाजवळ रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत महापालिकेचे आयुक्त स्वतः घटनास्थळी येऊन मदतीचे आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
चिखलठाणा परिसरात वाहतूक ठप्प
रास्ता रोकोमुळे चिखलठाणा परिसर आणि केंब्रिज चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली असून, वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे मनपा प्रशासनाच्या भूमिकेवर आणि रस्ता रुंदीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
महापालिकेने दिले पत्र
दरम्यान, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या पत्रात, नवपुते यांच्या जमिनीच्या मालकीच्या तसेच बांधकामाच्या अनुषंगाने कागदपत्रांची तपासणी व रीतसर प्रक्रिया करून त्यांच्या कायदेशीर वारसांना नियमानुसार टीडीआर (TDR), आरसीसी किंवा प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिका उपलब्ध करून देण्यात येईल असे म्हंटले आहे. मात्र, आंदोलक यावर समाधानी नसल्याची माहिती आहे.