मलकापूर बँकेच्या ठेवीदारांचा संयम सुटला; अध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक, मॅनेजरलाही चोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 20:26 IST2023-09-12T20:25:44+5:302023-09-12T20:26:28+5:30
मलकापूर बँक ठेवीदार कृती समितीने सिडको एन-३ येथील केशरबाग मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते.

मलकापूर बँकेच्या ठेवीदारांचा संयम सुटला; अध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक, मॅनेजरलाही चोप
छत्रपती संभाजीनगर : रिझर्व्ह बँकेने मलकापूर अर्बन को-ऑप. बँकेचा परवाना रद्द केला. यामुळे ४०० वर ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. सोमवारी आयोजित बैठकीत बँकेचे अध्यक्ष व माजी आ. चैनसुख संचेती हे आले असताना त्यांना ठेवीदारांच्या संतापाला सामोरे जावे लागले. त्यांनी बैठकीतून काढता पाय घेताच काही संतप्त युवकांनी त्यांच्या कारचा पाठलाग करीत दगडफेक केली. व्यवस्थापकाच्या श्रीमुखात भडकावली.
मलकापूर बँक ठेवीदार कृती समितीने सिडको एन-३ येथील केशरबाग मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. बँकेचे अध्यक्ष चेैनसुख संचेती हेही आले. ‘बँकेला ४७ कोटी ९१ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. आम्ही आरबीआयच्या विरोधात सक्षम प्राधिकरणाकडे अपील दाखल केले आहे. येत्या दि. २६ सप्टेंबरला नवी दिल्लीत सुनावणी आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल व बँकेला पुन्हा परवानगी मिळेल’, असे संचेती सांगत असताना ‘राजकीय भाषा बोलू नका, पैसे परत कधी देणार हे १०० रुपयांच्या बाँड पेपरवर लिहून द्या’, अशी भूमिका काही ठेवीदारांनी घेतली. वातावरण तापलेले पाहून पोलिस, सुरक्षा रक्षकाच्या फौजफाट्यात संचेती यांनी काढता पाय घेतला. बैठकीचे आयोजन कृती समितीचे शिवनाथ राठी यांनी केले होते. जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय संचेतीही हजर होते.
मार्च २०२४ मध्ये व्याजासह ठेवीदारांची रक्कम मिळेल
चैनसुख संचेती यांनी सांगितले की, आजघडीला बँकेकडे ६६९ कोटी ५९ लाख रुपयांच्या ठेवी असून, त्यात १२० पतसंस्थांच्या २१७ कोटींच्या ठेवी आहेत. उर्वरित ४५२ कोटी ५९ लाखांच्या ठेवी सामान्य ठेवीदारांच्या आहेत. आम्ही ठेवीदारांची रक्कम सहज देऊ शकतो. यासाठी आरबीआयची परवानगी मिळाली की, बँक मार्च २०२४ पर्यंत सर्व ठेवीदारांची रक्कम व्याजासह देईल.