महाकालेश्वरच्या भाविकांचा कन्नड घाटात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जणांची मृत्यूशी झुंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 16:31 IST2026-01-08T16:30:47+5:302026-01-08T16:31:12+5:30
उज्जैनच्या महाकालेश्वराकडे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाची झडप

महाकालेश्वरच्या भाविकांचा कन्नड घाटात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जणांची मृत्यूशी झुंज!
- प्रवीण जंजाळ
कन्नड ( छत्रपती संभाजीनगर) : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील भाविक उज्जैनच्या महाकालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या उत्साहात निघाले होते. मात्र, कन्नड घाटात त्यांच्या कारला झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (७ जानेवारी) रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घाटातील 'व्ही पॉईंट'जवळ घडला.
कठड्याला धडकून कारचा चक्काचूर
मिळालेल्या माहितीनुसार, शेवगाव येथील सात मित्र कारने (MH 16 DS 6050) उज्जैनकडे जात होते. कन्नड घाटात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार वेगात घाटाच्या संरक्षण कठड्याला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचा दर्शनी भाग पूर्णपणे दबला गेला. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिक आणि चाळीसगाव ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
तरुणांच्या निधनाने शेवगाववर शोककळा
अपघातातील जखमींना तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तुकाराम रामभाऊ अंभोरे (वय २७), शेखर रमेश दुरपते (वय ३१) आणि घनशाम रामहरी पिसोटे (वय ३०, सर्व रा. शेवगाव) यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी योगेश सोनवणे, अक्षय गिरे आणि ज्ञानेश्वर मोडे यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे, तर तुषार घुगे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शेवगाव तालुक्यात शोककळा
या भीषण अपघाताची वार्ता समजताच शेवगाव तालुक्यात शोककळा पसरली असून मृतांच्या नातेवाईकांनी चाळीसगाव येथे धाव घेतली आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.