'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:13 IST2025-05-23T12:12:14+5:302025-05-23T12:13:04+5:30

नारेगावमधून काही तासांत अटक; एटीएससह गुप्तचर यंत्रणांकडून समांतर तपास सुरू

'Long live Pakistan,' apprentice worker writes anti-national writing in company in Chikalthana MIDC | 'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!

'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील एक्सीडी इंडिया लि. कंपनीत तीन महिन्यांपूर्वीच रुजू झालेल्या शेख उमर शेख गफार (२२, रा. आयेशा पार्क, नारेगाव) याने केशरी रंगाच्या पेंटने 'पाकिस्तान जिंदाबाद' असे वाक्य लिहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवारी रात्री कंपनीने याप्रकरणी तक्रार देताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी त्याला मध्यरात्री १२ वाजता घरातून अटक केली.

१९ मे रोजी कंपनीच्या असेंब्ली विभागाच्या ९५२ क्रमांकाच्या इमेज मार्किंग मशिनवर रात्रपाळीतील कर्मचाऱ्यांना सदर मजकूर इंग्रजीत लिहिलेला आढळून आला होता. त्यांनी तत्काळ सुरक्षा अधिकाऱ्यांना याचा व्हिडिओ पाठवला. २० मे रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुपारच्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली. त्यात काही कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुसऱ्या पाळीत काम करणारा उमर बराच वेळ त्या मशिनजवळ बसलेला दिसल्याचे सांगितले. उमरला याबाबत विचारणा केली असता त्याने हे कबूल केले. कंपनीने याबाबत निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्याकडे तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य पाहता निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी वरिष्ठांना ही बाब कळवून तपास सुरू केला. मध्यरात्री १२ वाजता त्याला त्याच्या घरातून अटक केली. न्यायालयाने त्याला २५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे निरीक्षक कल्याणकर यांनी सांगितले.

एटीएस, गुप्तचर यंत्रणेचा या मुद्यांच्या आधारे तपास
-उमरचे कृत्य देशद्रोही असून, असे लिहिण्याचा त्याचा उद्देश काय होता?
-असे लिहिण्यासाठी उमरला कोणी प्रोत्साहित केले का? तो देशविरोधी व्यक्तीच्या संपर्कात आहे का?
-देशाच्या शत्रू राष्ट्राबाबत आकर्षण निर्माण होण्यासाठी कोणती शक्ती, संघटना कारणीभूत आहे?
-उमरचा मोबाइल, सोशल मीडिया अकाऊंट तपासून देशविघातक संघटना किंवा व्यक्तींच्या संपर्कात आहे का?

सिमकार्डचे रिकामे पाकीट, अनेक ई-मेल अकाऊंट्स
पोलिस, एटीएसकडून उमरच्या घराची तपासणी करण्यात आली. त्यात सिमकार्डचे रिकामे पाकीट, दोन सिमकार्ड, एटीएम कार्ड, बँक पासबुक सापडले. पोलिसांनी ते जप्त केले. उमरच्या मोबाइलमध्ये एकापेक्षा अधिक ई-मेल अकाऊंट्स आहेत. त्याचे तज्ज्ञांकडून विश्लेषण केले जात आहे.

संघटनेमार्फत नियुक्ती
बी.कॉम.च्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असलेला उमर तीन महिन्यांपूर्वीच शिकाऊ उमेदवार म्हणून नियुक्त झाला. कंपनीला पुण्याच्या युवा शक्ती फाऊंडेशनतर्फे हे शिकाऊ उमेदवार पुरवले जातात. उमरचे कुटुंब सर्वसाधारण असून त्याचे वडील एका खासगी कंपनीत कामगार असून आई गृहिणी आहे.

यापूर्वी 'नारेगाव' कनेक्शन समोर
देशविघातक कृत्य प्रकरणात यापूर्वी नारेगाव गुप्तचर यंत्रणांच्या तपासात केंद्रस्थानी राहिले आहे. काही वर्षांपूर्वी केंद्रीय गुप्तचर खाते व एनआयएच्या संयुक्त कारवाईत एका प्रतिबंधित संघटनेने देशविघातक कृत्यासाठी नारेगावमध्ये प्रशिक्षण केंद्र उभारल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले होते. एका पत्र्याच्या शेडमध्ये हे प्रशिक्षण पार पडले होते. त्या अनुषंगानेदेखील आता नव्याने तपास केला जाणार आहे.

Web Title: 'Long live Pakistan,' apprentice worker writes anti-national writing in company in Chikalthana MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.