जमीन घेतली पण व्यवहाराचे ६५ लाख दिलेच नाहीत; तणावातून वृद्ध शेतकऱ्याने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 14:50 IST2025-05-24T14:43:54+5:302025-05-24T14:50:01+5:30
खरेदी केलेल्या पाच एकर जमिनीचे नाही दिले पैसे : वैजापुरातील घटना, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

जमीन घेतली पण व्यवहाराचे ६५ लाख दिलेच नाहीत; तणावातून वृद्ध शेतकऱ्याने संपवले जीवन
वैजापूर : खरेदी केलेल्या पाच एकर शेतजमिनीचे ६५ लाख रुपये देण्यास टाळाटाळ केल्यामुळे एका वृद्धाने तणावातून विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शहरातील साळुंके वस्ती भागात मंगळवारी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी याच दिवशी रात्री आठ वाजता एका आरोपीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन दगू साळुंके (वय ६५, रा. साळुंके वस्ती, वैजापूर) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपाल भरतसिंग राजपूत (रा. आनंदनगर, वैजापूर) याने साळुंके यांची पाच एकर जमीन ६५ लाख रुपयांत खरेदी केलेली आहे. त्यानंतर राजपूत याने सोळंके यांना दारू पाजून जमिनीचे खरेदीखत करून घेतले; परंतु राजपूत याने ६५ लाख रुपये दिले नाही. या पैशाच्या वसुलीसाठी साळुंके यांनी राजपूत याच्याकडे अनेक वेळा चकरा मारल्या; परंतु राजपूत हा पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. यामुळे साळुंके हे तणावात होते. याच तणावातून त्यांनी मंगळवारी दुपारी २ वाजता घरीच विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी साळुंके यांची मुलगी अनिता सुनील रोठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजपूत विरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री आठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.