औरंगाबादमधून पळविलेली लाखोंची रक्कम चोरट्यांनी उधळली मुंबईतील बारबालांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 16:50 IST2019-07-11T16:47:33+5:302019-07-11T16:50:04+5:30
बारबाला असलेल्या मैत्रिणीच्या खात्यात मोठी रक्कम केली जमा

औरंगाबादमधून पळविलेली लाखोंची रक्कम चोरट्यांनी उधळली मुंबईतील बारबालांवर
औरंगाबाद : पैशाची बॅग पळविल्याप्रकरणी कोल्हापुरातून पकडून आणलेल्या तीनपैकी दोघांनी बारबालांवर लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याचे पोलीस तपासात समोर आले. एवढेच नव्हे, तर औरंगाबादेत लुटलेल्या लाखो रुपयांमधील मोठी रक्कम बारबाला असलेल्या मैत्रिणीच्या खात्यात जमा केल्याचे आढळून आले.
हर्सूल येथील प्रल्हाद विठ्ठल मोरे यांच्या हातातील तीन लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेल्याप्रकरणी गुन्हे शाखेने कोल्हापूर येथून विष्णूसिंह ऊर्फ विशालसिंह प्रमोदसिंह (घोडबंदर, ठाणे, मूळ रा. आग्रा, उत्तर प्रदेश), सोनूसिंह उमाशंकर सिंह (रा. राजगड, जि. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) आणि संदीप सत्तू सोनकर (रा. सोनपत, उत्तर प्रदेश) यांना ७ जुलै रोजी पकडून आणले होते. तेव्हापासून आरोपी पोलीस कोठडीत आहेत. आरोपींनी बहुतेक पैसे मुंबईतील लेडिज डान्सबारमध्ये मुलींवर उधळल्याचे सांगितले.
पोलीस कोठडी दोन दिवस
आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी (दि. १०) संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले. आरोपींनी आग्रा येथील एका महिलेच्या खात्यात रक्कम जमा केली होती. ही रक्कम जप्त करून आणण्यासाठी आरोपींना आग्रा येथे घेऊन जाणे असल्याने त्यांना ७ दिवस कोठडी देण्याची विनंती केली. मात्र, न्यायालयाने केवळ दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.