लबाडांनो पाणी द्या! ठाकरेसेनेचे छत्रपती संभाजीनगरात आंदोलन, चौकात बांधले हंड्याचे तोरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 15:27 IST2025-04-18T15:26:27+5:302025-04-18T15:27:08+5:30
शहराचा पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली.

लबाडांनो पाणी द्या! ठाकरेसेनेचे छत्रपती संभाजीनगरात आंदोलन, चौकात बांधले हंड्याचे तोरण
छत्रपती संभाजीनगर : "लबाडांनो पाणी द्या" अशा जोरदार घोषणाबाजी करत ठाकरेसेनेच्यावतीने आज शहरातील मुकुंदवाडी येथे पाण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी चौकात रिकाम्या हंड्याचे तोरण बांधून विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. शहराला १० ते १२ दिवसानंतर पाणी मिळत अशी खंत व्यक्त करत दानवे यांनी "लबाडांनो पाणी द्या" हे एक महिना चालणारे आंदोलन शासन आणि प्रशासन विरोधात असल्याचे सांगितले.
विरोधी पक्षनेते दानवे पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी येथील महानगरपालिकेच्या कार्यालयावर शिवसेनेच्या विरोधात हंडा मोर्चा काढला आला होता. त्यावेळी फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाला "सत्ता द्या" सहा महिन्याच्या आत पाणी देऊ असे आश्वासन दिले होते. तसेच मागील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान सुद्धा सरकार आल्यावर तीन महिन्याच्या आत शहराला पाणी देऊ अशी घोषणा फडणवीस यांनी केली होती. आज भाजपाचे सरकार येऊन ६ महिने झाले आहे. तरीही शहराला पाणी मिळाले नाही. ही परिस्थिती म्हणजे लबाडांचे आमंत्रण दिल्यासारखी आहे, अशी खरमरीत टीका दानवे यांनी केली.
शहराला २४० एमएलडी पाण्याची आवश्यकता असून दररोज १४० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. अशी स्थिती असताना शहराला दोन अथवा तीन दिवसाला पाणी मिळायला पाहिजे, मात्र ११ ते १२ दिवसाला शहराला पाणी मिळत असून पाणी पुरवठ्याची संपूर्ण व्यवस्था ठप्प झाली आहे. शिवसेनेचा महापौर असताना या व्यवस्थेवर नियंत्रण होते. मात्र सद्यस्थितीत प्रशासन यावर कसलेच लक्ष देत नाही. मनपा आयुक्त यांनी पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी दानवे यांनी केली.
आंदोलनात वऱ्हाड घेऊन निघालेला नवरदेव सहभागी
संजयनगर येथून गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथे लग्नासाठी निघालेल्या आनंद साळवे या नवरदेवाने देखील या आंदोलनात सहभाग घेतला. मागील १० ते १५ दिवसांपासून संजयनगर परिसरात पाणी आले नाही. दररोज टँकर विकत घेऊन पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. लग्नासाठी घरी आलेल्या नातेवाईक, कुटुंबीयांना घरी पाण्याची व्यवस्था नसल्याने मोठा मनस्ताप होत आहे. "लबाडांनो पाणी द्या" हे आंदोलन शहरवासीयांच्या समस्यांना वाचा फोडणारे असल्याने आंदोलनात सहभागी झालो असल्याचे नवरदेव आनंद म्हणाला.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब डांगे, संतोष जेजुरकर, विजय वाघमारे, संतोष खेंडके, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, शहर संघटक सचिन तायडे, माजी नगरसेवक वीरभद्र गादगे,मनोज गांगवे, उपशहरप्रमुख लक्ष्मण पिवळ, रवी गायकवाड, सचिन वाघ,नाना जगताप, विभागप्रमुख भाऊसाहेब राहटे, पंडित बोरसे, शाखाप्रमुख प्रश्नात दिगुळे, राम केकान, गणेश राऊत, शरद जायभाये, शाहू चित्ते, प्रशांत कुऱ्हे, दत्तू देहाडे, देवा जाधव, शाम देशमुख, भरत पाटील, महादेव कोल्हे, भगवान कोकाटे, साईनाथ जाधव,रुपेश मालाणी,शैलेश गणोरकर,दत्ता कणसे,युवासेना जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे,माजी महापौर सुनंदा कोल्हे, महिला आघाडी सहसंपर्क संघटक दुर्गा भाटी, महानगर संघटक सुकन्या भोसले, शहर संघटक सुनिता औताडे, भागूआक्का शिरसाठ, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, शोभा साबळे, मीना थोरवे, कविता मठपती, बबिता गायकवाड, नंदा काळवणे, मनिषा खरे, नुसरत जहाँ, रुपाली मुंदडा, राम दुलारी भाभी, लता शंखपाल, आरती साळुंके, रेखा शहा, शोभा पोफळघट, चंद्रकला उबाळे, शोभा गायकवाड, नंदा मुराते, दुर्पदा साळवे,सीमा गवळी, पद्मा तुपे, रेखा फलके, पंचशीला त्रिभुवन व छाया देवराज व युवतीसेना सहसचिव सानिका देवराज आदींचा आंदोलनात सहभाग होता.