छत्रपती संभाजीनगर : ‘लबाडांनो पाणी द्या’ या शीर्षकाखाली शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा शुक्रवारी असून तत्पूर्वी गुरुवारी भाजपने ठाकरे गटाच्या विरोधात आरोपांची माळ लावली. ठाकरे गट सोंग करीत असून मोर्चाचे ढोंग करीत आहे. मनपात सत्तेत असताना सर्वाधिक महापौर त्यांचे राहिले. त्यांच्या काळात पाणीपुरवठ्याचे वाटोळे होण्यासह अनेक योजनांचा बट्ट्याबोळ झाला. त्यामुळे खरी लबाडी ठाकरे गटाने केल्याची टीका भाजपचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, माजी महापौर बापू घडमोडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
ठाकरे गटाचा मोर्चा माजी खा.चंद्रकांत खैरे विरुद्ध विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अशा शक्तिप्रदर्शनाच्या गटबाजीतून होत आहे. सामान्य नागरिकांच्या पाणीप्रश्नासाठी लढत असल्याचा आव आणत ते राजकारण करीत आहेत, असे भाजपचे म्हणणे आहे.
त्यांच्यासोबत सत्तेची चव भाजपने देखील ३० वर्षे चाखली. मग लबाडी त्यांनी एकट्याने कशी काय केली, यावर बोलताना खा. कराड म्हणाले, खैरेंनी मनपा एकहाती चालवली. भाजपने त्यांच्या धोरणाला वारंवार विरोध केला. खरे लबाड ठाकरे व त्यांचा गट आहे. त्यांच्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे दोन ते अडीच वर्षे नुकसान झाले. पाणीपुरवठा योजना त्यांच्या महापौरांच्या कार्यकाळात आल्या, आणि त्यांच्याच कार्यकाळात बंद पडल्या. त्यामुळे हे शहर आजही पाणीपुरवठ्यापासून वंचित असल्याची टीका ओबीसी कल्याणमंत्री सावे यांनी केली. शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था तातडीने सुधारण्यासाठी मनपा प्रशासनाशी तांत्रिकदृष्ट्या बोलणी सुरू आहे. डिसेंबर २५ पर्यंत योजनेचा पहिला टप्पा सुरू करून शहराला तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पूर्ण यंत्रणा काम करीत आहे. या वेळी प्रशांत देसरडा, अनिल मकरिये आदींची उपस्थिती होती.
उद्योग पाणीपुरवठा योजनेमुळे येणार...आगामी काळामध्ये या शहरात मोठे मोठे उद्योग येणार आहेत. उद्योगांना लागणारे पाणी देण्यासाठी नवीन योजनेचे काम लवकर पूर्ण करून शहराला रोज पाणी देणे हेच भाजपचे लक्ष्य आहे. ठाकरे सरकारच्या काळामध्ये अडीच वर्षे योजनेची संचिका मातोश्री आणि त्या वेळी असलेले पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे कितीदा गेली याचा पूर्ण रेकॉर्ड आजही मंत्रालयात आहे. योजनेची कोट्यावधी रुपये किंमत वाढण्याची कारणे त्या संचिकेत दडलेली आहेत.अतुल सावे, ओबीसी कल्याण मंत्री
खैरेंची २० वर्षे मनपात लुडबूड२० वर्षे खैरेंनी मनपात लुडबूड केली. प्रत्येक योजनेची विषयपत्रिका त्यांच्याकडे गेल्याविना मंजूर होत नव्हती. सर्वाधिक महापौर त्यांच्या पक्षाचे राहिले. मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे योजनेला मंजुरी न दिल्यामुळे किंमत वाढली. सरकार बदलल्यावर योजनेला गती मिळाली.- डॉ. भागवत कराड, खासदार
ठाकरे सरकारमुळे किंमत वाढली...योजनेच्या निविदेत देखील ठाकरे सरकारच्या काळात लुडबूड झाली. अडीच वर्षाच्या काळात कंत्राटदाराकडून जे मिळाले, त्यात भागविले.- आ. संजय केणेकर
आदित्यचे योगदान काय...मोर्चाला आदित्य ठाकरे येत आहेत. त्यांचे सरकार असताना या योजनेसाठी अडीच वर्षात त्यांनी काय योगदान दिले हे स्पष्ट करावे, असे आमचे आवाहन आहे.- शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष
शिंदेसेनेची गैरहजेरी...शिंदेसेनेतील अनेकजण यापूर्वी ठाकरे गटात होते. त्यांनीही पालिकेत महापौरासह अनेक पदे भोगली आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेला येणे अपेक्षित होते. मात्र सरकार म्हणून आम्ही ठाकरे गटाला उत्तर देत असल्याचे भाजपने स्पष्ट केले.