फळबाग योजनेच्या मंजुरीसाठी २० हजाराची लाच घेताना कृषी सेवक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 19:59 IST2021-01-07T19:58:34+5:302021-01-07T19:59:15+5:30
वरिष्ठांना अहवाल देऊन मंजुरीसाठी ५० हजाराची लाच मागितली होती.

फळबाग योजनेच्या मंजुरीसाठी २० हजाराची लाच घेताना कृषी सेवक अटकेत
सोयगाव : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतील प्रकरणांचा मंजुरीसाठी अहवाल पाठविण्यासाठी २० हजाराची लाच स्वीकारताना कृषी सेवकास सोयगाव तालुका कृषी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. प्रवीण सावकारे (४५) असे कृषी सेवकाचे नाव आहे. या कारवाईमुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कृषी सेवक प्रवीण सावकारे हा बहुलखेडा येथे कार्यरत आहेत. येथील तक्रारदार शेतकऱ्याच्या शेतातील भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या दोन मंजूर प्रकरणाची पाहणी करण्यासाठी व कुटुंबातील उर्वरित दोन सदस्यांच्या प्रकरणाला मंजुरीसाठी वरिष्ठांना अहवाल देण्यासाठी ५० हजाराची लाच मागितली होती. या प्रकरणी गुरुवारी झालेल्या तडजोडीअंती २० हजार देण्याचे ठरले. गुरुवारी सावकारे यांना वीस हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्याऔरंगाबाद पथकाने रंगेहात पकडले. या प्रकारामुळे सोयगावला शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, उपअधीक्षक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास धनवट, गणेश पांडूरे, प्रकाश घुगरे, पोलीस नाईक जोशी, मिलिंद इप्पर, वाहनचालक बागुल आदींच्या पथकाने केली.