मराठवाड्यात ३ हजार ९२९ गावांतील खरीप पिकांचा चिखल, १६ लाख शेतकऱ्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 17:44 IST2025-09-05T17:43:23+5:302025-09-05T17:44:54+5:30

१२ लाख ४६ हजार २४९ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिके अतिवृष्टीमुळे संपुष्टात

Kharif crops in 3,929 villages in Marathwada affected by mud, 1.6 million farmers affected | मराठवाड्यात ३ हजार ९२९ गावांतील खरीप पिकांचा चिखल, १६ लाख शेतकऱ्यांना फटका

मराठवाड्यात ३ हजार ९२९ गावांतील खरीप पिकांचा चिखल, १६ लाख शेतकऱ्यांना फटका

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील ३ महिन्यांत झालेल्या अतिपावसामुळे विभागातील ३ हजार ९२९ गावांतील खरीप पिकांचा चिखल झाला आहे. १५ लाख ७८ हजार ३३ शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या हातून गेल्या आहेत. असे असताना नुकसानीच्या पंचनाम्यांना अद्याप गती मिळालेली नाही. ५ लाख ६२ हजार ७२७ हेक्टरवरील पंचनामे सध्या पूर्ण झाले आहेत. ७ लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे अजून बाकी आहेत. १२ लाख ४६ हजार २४९ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिके अतिवृष्टीमुळे संपुष्टात आल्याचे विभागीय प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात नमूद आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. लातूर दुसऱ्या क्रमांकावर, हिंगोली तिसऱ्या, धाराशिव नुकसानीत चौथ्या क्रमांकावर आहे.

विभागातील ५० टक्के उत्पादन घटणार
विभागातील ८ हजार ५५० गावांपैकी सुमारे ४ हजार गावांतील खरीप पिकांचा चिखल झाला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील खरिपाचे ५० टक्के उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. याचा परिणाम आगामी काळातील महागाई वाढण्यावर होण्याची शक्यता आहे.

पिकांचे नुकसान असे
जिरायत....१२ लाख ३६ हजार ३०१ हेक्टर
बागायत...३ हजार ८९ हेक्टर
फळपीक...६ हजार ८७८ हेक्टर
एकूण.....१२ लाख ४६ हजार २४९ हेक्टर

किती गावांतील किती शेतकऱ्यांचे नुकसान
जिल्हा.......................गावे................शेतकरी............किती पंचनामे
छत्रपती संभाजीनगर.......५५................४०६६..................६१ टक्के
जालना.....................१८४................२७६५९...............०० टक्के
परभणी....................३१९................१४३१३५.................८२ टक्के
हिंगोली......................७०३.............१७२५७७.................७८ टक्के
नांदेड.........................१३२६.........६५५४१५...................७० टक्के
बीड..........................२०६...............४२८९५.................७० टक्के
लातूर......................७८२................३६४५५१................०.५९ टक्के
धाराशिव...................३६४.................१६७७३५...............४३ टक्के
एकूण......................३९२९...............१५७८०३३...............४५ टक्के

२८९५ मालमत्तांचे नुकसान
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील २८९५ मालमत्तांचे नुकसान झाले आहे. ६ मालमत्ता पुरात वाहून गेल्या. ४१५ मालमत्तांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. २८९५ मालमत्तांची अशंत: पडझड झाली आहे. ७२ झाेपड्या पुरात वाहून गेल्या. २५६ जनावरांचे गोठेही पडले. तर १ हजार ४९ सर्व प्रकारांतील जनावरांचा मृत्यू अतिवृष्टीत झाला. ५० व्यक्ती पुरात वाहून व वीज पडून दगावल्या.

Web Title: Kharif crops in 3,929 villages in Marathwada affected by mud, 1.6 million farmers affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.