कन्हैयाची सभा औरंगाबादेत लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2016 01:41 IST2016-05-01T01:34:10+5:302016-05-01T01:41:12+5:30

औरंगाबाद : कन्हैयाकुमार याच्यासह रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला, रामा नागा, उमर खालेद, शैला रशीद, रिचासिंग अर्निबान भट्टाचार्य आदींची सभा या (मे) महिन्यात आयोजित केली

Kanhaiya Sabha soon in Aurangabad | कन्हैयाची सभा औरंगाबादेत लवकरच

कन्हैयाची सभा औरंगाबादेत लवकरच

औरंगाबाद : अल्पावधीत प्रसिद्धीच्या झोतात आलेला जेएनयू स्टुडंटस् युनियनचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याच्यासह रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला, रामा नागा, उमर खालेद, शैला रशीद, रिचासिंग अर्निबान भट्टाचार्य आदींची सभा या (मे) महिन्यात औरंगाबादेत आयोजित केली जाणार असल्याची माहिती भारिप- बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकारांशी बोलताना भुईगळ म्हणाले की, आंबेडकर स्टुडंटस् असोसिएशनचा कार्यकर्ता तथा संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला याचा आदर्श घेऊन कन्हैयाकुमार हा सध्या देशभरात सभा घेऊन समाजामध्ये जनजागृती करीत आहे. कन्हैयाकुमार हा सध्या देशातील युवकांचा ‘आयडॉल’ झालेला असून, त्यास प्रत्यक्ष पाहता यावे आणि त्याचे झंझावाती भाषण ऐकता यावे म्हणून मराठवाड्यात युवकांची अपेक्षा आहे की त्याची सभा औरंगाबादेत घ्यावी. त्यानुसार भारिप- बहुजन महासंघ मे महिन्यात कन्हैयाकुमारसह अन्य मान्यवरांची सभा घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. शिवाय भारिप- बहुजन महासंघाने कन्हैयाकुमारच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली आहे. कोणाच्याही विरोधाला न जुमानता कन्हैयाकुमारची औरंगाबादेतील सभा यशस्वी होईल, असा विश्वास अमित भुईगळ यांनी व्यक्त केला.
बाबासाहेबांचा विचार लोकशाही आणि या देशातील समाजासाठी पोषक असल्याचे तो सांगत आहे. त्यामुळे त्याला संघवादी विचाराच्या संघटना प्रखर विरोध करीत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत त्याच्या मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी सभा झाल्या आहेत. त्याची चौथी सभा औरंगाबादेतच होईल. कन्हैयाकुमारची औरंगाबादेतील सभा यशस्वी करून दाखवू, असा दावाही अमित भुईगळ यांनी केला आहे.
यावेळी बुद्धप्रिय कबीर, पंडित तुपे, दिनेश साळवे, भारत शिरसाठ, श्रीरंग ससाणे, दीपक केदार, प्रकाश इंगळे, जितेंद्र शिरसाठ, भारत दाभाडे, नितीन भुईगळ यांची उपस्थिती होती.

Web Title: Kanhaiya Sabha soon in Aurangabad