जायकवाडीच्या डाव्या कालव्याची तब्बल ४० वर्षानंतर होणार दुरुस्ती; ७३५ कोटी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 19:19 IST2025-05-22T19:19:41+5:302025-05-22T19:19:57+5:30
कालव्याच्या दुरुस्तीसाठी बीजीएम तंत्राचा वापर करणार; दुरुस्तीनंतर ५ टीएमसी पाण्याची बचत होणार

जायकवाडीच्या डाव्या कालव्याची तब्बल ४० वर्षानंतर होणार दुरुस्ती; ७३५ कोटी मंजूर
छत्रपती संभाजीनगर : परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या ३ जिल्ह्यांतील तब्बल १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने ७३५ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. महिनाभरात या कामाच्या निविदा प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.
जायकवाडी प्रकल्पाच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. प्रकल्पापासून डावा आणि उजवा असे दोन कालवे आहेत. डावा कालवा २०८ किलोमीटर लांबीचा, तर उजवा कालवा १३० किमी लांबीचा आहे. डाव्या कालव्याची पाणी वहन क्षमता मोठ्या प्रमाणात घटल्याने या कालव्याची तातडीने दुरुस्ती करण्याचा अहवाल वर्ष २००५ मध्ये एका समितीने केलेल्या सर्वेक्षणानंतर शासनास दिला. मात्र, मागील २० वर्षांपासून या दुरुस्तीला मुहूर्त लागला नव्हता. डाव्या कालव्यासह मुख्य आणि उपवितरिकांना जागोजागी भगदाड पडले आहे. झाडेझुडपे उगवलेली आहेत. यामुळे डाव्या कालव्याची पाणी वहन क्षमता ४०टक्के घटली आहे. शिवाय सिंचन क्षमताही घटली आहे.
या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या छत्रपती संभाजीनगर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने (कडा) जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासह उपवितरिकांच्या दुरस्तीसाठी शासनाला तब्बल ३२०० कोटी रुपयांच्या प्रस्ताव दिला होता. महाराष्ट्र सिंचन सुधारणा योजनेअंतर्गत (एमआयआयपी) जायकवाडी प्रकल्पाचा डाव्या कालव्यासाठी ७३५ कोटी रुपये मंजूर केले. आता केवळ मुख्य कालव्याची दुरुस्ती करण्यात येईल. या कामाच्या तांत्रिक निविदा तयार करण्यात आल्या असून, तपासणीसाठी नाशिक येथील राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या. समितीने मंजुरी देताच महिनाभरात निविदा प्रक्रिया होणार असल्याचे मुख्य अभियंता जयंत गवळी यांनी सांगितले.
डाव्या कालव्याची लांबी -- २०८ किलोमीटर
सिंचन क्षमता १ लाख ४० हजार हेक्टर
कालव्याच्या दुरुस्तीसाठी बीजीएम तंत्राचा वापर करणार
दुरुस्तीनंतर ५ टीएमसी पाण्याची बचत होणार
४० वर्षांत डाव्या कालव्याची दुरुस्ती
२०८ किलोमीटर डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने ७३५ कोटी रु. मंजूर केले. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले. मागील ४० वर्षांत डाव्या कालव्याची दुरुस्ती न झाल्याने वहन क्षमता घटली आहे. सध्या एका आवर्तनासाठी २५ ते ३० दिवसांचा कालावधी लागतो. हा कालावधी दुरुस्तीनंतर १७ ते २० दिवसांपर्यंत येईल.
- जयंत गवळी, मुख्य अभियंता, जलसंपदा.