जायकवाडीचा नवा विक्रम! गोदावरीला रौद्ररूप, यापूर्वी कधी झाला १ लाखापेक्षा जास्त विसर्ग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:11 IST2025-09-29T13:08:16+5:302025-09-29T13:11:48+5:30
जायकवाडी धरणातून कधी कधी केला १ लाखापेक्षा जास्त विसर्ग? १९ वर्षांनंतर पैठण शहरामध्ये शिरले पाणी

जायकवाडीचा नवा विक्रम! गोदावरीला रौद्ररूप, यापूर्वी कधी झाला १ लाखापेक्षा जास्त विसर्ग?
पैठण : पाणलोट क्षेत्रात झालेल्या शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणात २ लाख ८४ हजार ४९८ क्युसेेकने पाण्याची आवक होऊ लागली. त्यामुळे रविवारी जायकवाडीच्या सर्व २७ दरवाजांतून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढत गोदापात्रात ३ लाख ६ हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला. यामुळे १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा पैठण शहराचा सखल भाग आणि गोदाकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले.
जायकवाडी धरणात पूर्ण क्षमतेने भरून २००६ मध्ये सुमारे अडीच लाख क्युसेक पाणी गोदपात्रात सोडण्यात आले होते. त्यामुळे जवळपास अर्धे शहर पाण्याखाली गेले होते. १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा विक्रमी ३ लाखांवर विसर्ग करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी सकाळी ११:३० वाजता जायकवाडी धरणाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. आवक आणि विसर्ग याचे योग्य नियोजन करूनच गोदापत्रात विसर्ग करण्याचे आदेश देण्यात आले.
रविवारी सकाळपासून आपत्कालीन दरवाजांसह सर्व २७ दरवाजांतून २ लाख २६ हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला. यामुळे पैठण शहरातील सखल भागामाध्ये पाणी शिरले आहे. शहरातील गागाभट चौक परिसर, जुनानगर रोड, पालखी ओटा, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, कहार वाडा आदी भागांमध्ये पाणी साचले आहे. यासह साठेनगर, परदेशीपुरा, हमाल गल्ली, प्रतिष्ठान कॉलेज मागील काही नागरिक, संत नगर, लहुजीनगर, जैनपुरा आदी भागांतील रहिवाशांना नाथ हायस्कूल, कन्या प्रशाला, बॉइज हायस्कूल येथे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, रात्रीतून विसर्ग ३ लाख ६ हजार क्युसेकवर करण्यात आला.
सहा गावांतील नागरिकांचे स्थलांतर
गोदाकाठच्या सहा गावांमध्ये रविवारी पाणी शिरले होते. त्यामुळे कुरणपिंपरी येथील रहिवाशांना आपेगावातील मंगल कार्यालयात, मायगाव येथील रहिवासी गोपेवाडीतील जि. प. शाळेत, नवगावचे रहिवासी तुळजापूर जि. प. शाळेत, हिरडपुरीतील रहिवासी विहामांडवा येथे, तर वडवळी येथील रहिवाशांना वाघाडीतील भगीरथी शाळेत स्थलांतरित करण्यात येत असल्याचे तहसीलदार ज्योती पवार यांनी सांगितले. स्थलांतरित नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था नाथ संस्थांनच्या माध्यमातून करण्यात आल्याचे आमदार विलास भुमरे म्हणाले.
नाशिकचे पाणी झेपावले
नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे १३ हजार क्युसेकने गोदापात्रात विसर्ग केला जात आहे. हे पाणी रविवारी रात्री उशिरा जायकवाडी धरणात झेपावणार आहे. त्यामुळे आधीच तुडुंब भरलेल्या जायकवाडीतून गोदावरीत सुरू असलेला विसर्ग आवश्यकतेनुसार वाढवण्यात येणार असल्याचे गोदावरी पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.
आवक कमी झाल्याने दिलासा, विसर्गही घटणार
आज, २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता जायकवाडी प्रकल्पातून तब्बल २ लाख ४५ हजार क्युसेक इतका प्रचंड विसर्ग नदीपात्रात सुरू होता. मात्र, आता दिलासादायक वृत्त आहे की, धरणाकडे येणारी पाण्याची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. सध्या येणारी आवक २ लाख ३० हजार क्युसेक इतकी झाली आहे, जी विसर्गापेक्षा कमी आहे. या पार्श्वभूमीवर, जायकवाडी धरणाच्या व्यवस्थापनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, धरणातून होणारा विसर्ग लवकरच कमी करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेला विसर्ग २ लाख क्युसेक्स किंवा त्याहूनही कमी करण्यात येईल, अशी माहिती छत्रपती संभाजी नगरच्या मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षातील स. को. सब्बीनवार यांनी दिली आहे.
कधी कधी केला १ लाखापेक्षा जास्त विसर्ग?
वर्ष, विसर्ग (क्युसेक)
१९७६ - १ लाख ५० हजार,
१९८० - १ लाख ३० हजार,
१९९४ - १ लाख १६ हजार,
२००६ - २ लाख ५० हजार
२००८- १ लाख ५४ हजार,
२०२२ - १ लाख १३ हजार
२०२५ - ३ लाख ६ हजार