कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी कंपनी मालकाची

By बापू सोळुंके | Published: January 2, 2024 02:13 PM2024-01-02T14:13:47+5:302024-01-02T14:14:49+5:30

औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे उपसंचालक धीरज खिरोडकर यांच्याशी बातचीत

It is the responsibility of the company owner to take care of the safety of the workers | कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी कंपनी मालकाची

कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी कंपनी मालकाची

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसीतील सनशाईन इंटरप्रायजेस कंपनीला शनिवारी रात्री लागलेल्या आगीत सहा कामगारांना जीव गमवावा लागला. सर्व मृत कामगार दिवसा कंपनीत काम करीत आणि रात्री कंपनीच्याच खोलीत राहात असत. कायद्यानुसार कोणालाही कारखान्यात राहता येत नाही. शिवाय कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी कंपनी मालक आणि व्यवस्थापनाची असल्याचा दावा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य उपसंचालक धीरज खिराेडकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केला. ‘लोकमत’ने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अशी उत्तरे दिली.

प्रश्न- आपल्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे आहेत?
उत्तर- माझी पोस्टिंग छत्रपती संभाजीनगर विभागात असली तरी नांदेड विभागाचा अतिरिक्त पदभारही असल्याने संपूर्ण मराठवाडा माझे कार्यक्षेत्र आहे.

प्रश्न- सनशाईन इंटरप्रायजेस कंपनीची आपल्या कार्यालयाकडे नोंदणी आहे का? आपण या घटनेपूर्वी या कंपनीची तपासणी केली होती का?
उत्तर- फॅक्टरी ॲक्टनुसार ज्या कंपनीत २० अथवा त्याहून अधिक कामगार एका पाळीत काम करतात अथवा स्फोटक, ज्वलनशील पदार्थ आणि रसायनांचा वापर उत्पादनासाठी होतो, अशा दहा कामगारांच्या कंपनीची आमच्या कार्यालयाकडे नोंद होते. सनशाईन इंटरप्रायजेस या कंपनीत २० पेक्षा कमी कामगार असल्याची प्राथमिक माहिती आहे, शिवाय कंपनी मालकाने आमच्या कार्यालयाकडे नोंदणीसाठी अर्ज केलेला नाही. यामुळे या कंपनीला आम्ही घटनेपूर्वी कधीच भेट दिली नाही.

प्रश्न- कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणावर असते ?
उत्तर- कंपनीच्या गेटच्या आतमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीविताची काळजी घेण्याची जबाबदारी कंपनी व्यवस्थापन आणि मालकाची असते. यामुळे कालच्या घटनेला सर्वस्वी कंपनीमालक आणि संबंधित जबाबदार आहेत.

प्रश्न- आपल्या कार्यालयाकडून कंपन्यांची तपासणी कधी केली जाते?
उत्तर- सन-२०१६ नंतर अस्तित्वात आलेल्या केंद्रीय निरीक्षण प्रणालींकडून दरमहा कोणत्या कंपनीची किती तारखेला तपासणी करायची आहे, याचे शेड्युल औद्योगिक सुरक्षा अधिकाऱ्यांना प्राप्त होते. या शेड्युलनुसार अधिकारी संबंधित कंपनीला भेट देऊन कार्यवाही करीत असतात.

प्रश्न-एमआयडीसीमध्ये सनशाईन इंटरप्रायजेससारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तुमच्या विभागाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत?
उत्तर- आमचे कार्यालय उद्योजकांची संघटना असलेल्या मासिआ, सीएमआयए सारख्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना भेटून सर्व सदस्यांनी त्यांच्या कारखान्याचे सुरक्षा ऑडिट करून घेण्याचे आवाहन करतो. शिवाय सुरक्षेबाबत उद्योजकांमध्ये जनजागृती करीत असतो.

Web Title: It is the responsibility of the company owner to take care of the safety of the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.