माध्यमांच्या संकुचित दृष्टिकोनामुळे चिघळला एनआरसीचा मुद्दा - मेघना ढोके

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 05:43 AM2019-09-29T05:43:30+5:302019-09-29T05:44:07+5:30

राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी आसामातील स्थानिक नागरिकांची मनोभूमिका समजूून घेण्याकडे केलेले दुर्लक्ष व तेथील स्थानिक माध्यमे अतिसंवेदनशील झाल्याने त्यांना त्यांच्या व्यथा देशपातळीवर नेण्यात आलेल्या मर्यादेमुळे राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मुद्दा चिघळला.

The issue of NRC irritated by the narrow view of the media - Meghan Dhoke | माध्यमांच्या संकुचित दृष्टिकोनामुळे चिघळला एनआरसीचा मुद्दा - मेघना ढोके

माध्यमांच्या संकुचित दृष्टिकोनामुळे चिघळला एनआरसीचा मुद्दा - मेघना ढोके

googlenewsNext

औरंगाबाद : राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी आसामातील स्थानिक नागरिकांची मनोभूमिका समजूून घेण्याकडे केलेले दुर्लक्ष व तेथील स्थानिक माध्यमे अतिसंवेदनशील झाल्याने त्यांना त्यांच्या व्यथा देशपातळीवर नेण्यात आलेल्या मर्यादेमुळे राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मुद्दा चिघळला. ३.१९ कोटी आसामी नागरिकांच्या आयुष्यात यामुळे काय घडले, याकडे माध्यमांनी लक्षच दिले नाही, असे निरीक्षण ‘लोकमत’च्या मुख्य उपसंपादक मेघना ढोके यांनी शनिवारी येथे नोंदविले.

ग्रंथाली व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दिली जाणारी अरुण साधू पाठ्यवृत्ती येथील एमजीएम संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार, खा. कुमार केतकर व ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या हस्ते मेघना ढोके यांना प्रदान करण्यात आली. या पाठ्यवृत्तींतर्गत मेघना ढोके यांनी गेले वर्षभर ‘एनआरसी’वर केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष व त्यांची निरीक्षणे यावेळी जाहीर केली. त्या म्हणाल्या, बांगलादेशातून १९७१-७२ नंतर जे लोंढे भारतातील आसामात आले, त्याविरुद्ध १९८० पासून ओरड सुरू झाली. २०१४ मध्ये केंद्र सरकारने एनआरसीचा निर्णय घेतला. एनआरसी म्हणजे बांगलादेशींना परत पाठविणे नाही तर केवळ आसामातील रहिवाशांचे नागरिकत्व पडताळणी आहे. नागरिकत्वाची पहिली यादी तयार झाली तेव्हा त्यात ४० लाख आसामी नागरिकांना त्यांचे भारतीयत्व सिद्ध करता आले नाही. दुसऱ्या यादीत ही संख्या १९ लाख एवढी असून त्यातील १४ लाख हे हिंदू आहेत.
त्या पुढे म्हणाल्या की, परिस्थिती अशी असताना माध्यमांनी हा मुद्दा हिंदूविरुद्ध मुस्लिम असा पेटविला. मुळात येथे हिंदू-मुस्लिम असा प्रश्नच नव्हता. बंगालीविरुद्ध आसामी अर्थात स्थानिक कोण व बाहेरचे कोण, असे हे भांडण आहे. नागरिकत्व सिद्ध करणाºयासाठी धडपडणाºया या नागरिकांच्या आयुष्यात काय घडत होते. मात्र, याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. जो तो कागदावरील थेअरी मांडत होता; परंतु जेव्हा मी या नागरिकांच्या अंतरंगात डोकावले तेव्हा परिस्थिती वेगळीच दिसली. येथे नागरिकांचे अनेक व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार झाले होते. त्यातून कोण कुणाचा, मामा, काका, पुतण्या, भाचा, आजोबा, असे नाते शोधले जात होते. मागच्या अनेक पिढ्यांपासून नोकरीधंद्यानिमित्त इतरत्र पांगलेले नातेवाईक पुन्हा एकत्र आले. समाजात असे अनेक बदल घडत होते. यासह आसामातील अनेक अनुभव ढोके यांनी सांगितले.
या अभ्यासासाठी लोकमत समूहाने केलेल्या मदतीचा गौरवपूर्ण उल्लेखही ढोके यांनी केला. पाठ्यवृत्तीचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे आणि प्रा. जयदेव डोळे यांनी काम पाहिले. यावेळी व्यासपीठावर एमजीएमचे सरचिटणीस अंकुशराव कदम, ग्रंथालीच्या अरुणा साधू, पद्मभूषण देशपांडे, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, एमजीएम पत्रकारिता विभागाच्या प्रमुख डॉ. रेखा शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावर्षी दोघांना पाठ्यवृत्ती
आगामी वर्षासाठी दोन पत्रकारांची पाठ्यवृत्तीसाठी निवड झाल्याची घोषणा डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी केली. त्यात पत्रकार दत्ता जाधव व मुक्ता चैतन्य यांचा समावेश आहे. जाधव हे गोवंश हत्याबंदी व त्याचा शेतकऱ्यांवर होणारा परिणामाचा अभ्यास करणार आहे. मुक्ता चैतन्य पोर्नोग्राफीचा बालकांवर होणारा परिणाम अभ्यासणार आहेत.
 

Web Title: The issue of NRC irritated by the narrow view of the media - Meghan Dhoke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.