गैरहजर कर्मचाऱ्यांची चौकशी

By Admin | Updated: April 21, 2016 00:58 IST2016-04-20T23:53:39+5:302016-04-21T00:58:42+5:30

ढोकी : उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा गोंधळी कारभार ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणला होता.

Invalid employees inquiry | गैरहजर कर्मचाऱ्यांची चौकशी

गैरहजर कर्मचाऱ्यांची चौकशी


ढोकी : उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा गोंधळी कारभार ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणला होता. याची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. फुलारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती जे कोणी दोषी आढळून येतील, त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जाणार आहे.
ढोकी आरोग्य केंद्रात अपघातग्रस्तांसह सातत्याने रूग्णांची वर्दळ असते. ही बाब लक्षात घेवून आरोग्य यंत्रणेकडून येथे तीन डॉक्टरांसह वीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणात यंत्रणा असून रूग्णांना उत्तम सेवा मिळत नसल्याबाबत सातत्याने ओरड होत आहे. मंगळवारी तर कर्मचाऱ्यांनी कहरच केला. वीस पैकी अवघे दोनच कर्मचारी उपस्थत होते. कार्यालयालाही कुलूप लावले होते. रूग्णालाच्या दरवाजावरच ‘डॉक्टर सुटीवर आहेत’, असा फलक लावण्यात आला होता. त्यामुळे येथे येणाऱ्या ग्रामीण रूग्णांना फलक बघूनच खाजगी दवाखान्याचा रस्ता धरावा लागला. तर काही रूग्णांनी उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालय गाठले. हा गोंधळी कारभार ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणला. दरम्यान, सदरील वृत्त प्रकाशित होताच खडबडून जाग्या झालेल्या आरोग्य विभागाने ढोकी आरोग्य केंद्रातील गोंधळी कारभाराच्या चौकशीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी बुधवारी एका कर्मचाऱ्यास ढोकी केंद्रावर पाठवून सर्व कर्मचाऱ्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात घेतले आहे. सदरील म्हणणे प्राप्त झाल्यानंतर त्याची शहानिशा करण्यात येणार आहे. या माध्यमातून दोषी आढळून येणाऱ्या कर्मचाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. फुलारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Invalid employees inquiry