धिंड काढलेल्या गुंड तेजाच्या घर, वीज मीटरची माहिती मागवली; अनधिकृत असल्यास कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 16:32 IST2025-08-14T16:31:24+5:302025-08-14T16:32:10+5:30
गुडघ्यावर, मुंडन, धिंड; ‘चार मुलींना मारेन’ म्हणणाऱ्या तेजाचा पोलिसांनी माज उतरवला

धिंड काढलेल्या गुंड तेजाच्या घर, वीज मीटरची माहिती मागवली; अनधिकृत असल्यास कारवाई
छत्रपती संभाजीनगर : मैत्रिणीवर गोळीबार करून पोलिसांसमक्ष जामिनावर सुटल्यावर ‘आणखीन चार मुलींना मारेन, त्यात काय एवढे’, अशी धमकी देणारा गुन्हेगार सय्यद फैजल सय्यद एजाज उर्फ तेजा (रा. किलेअर्क) याचा गुन्हे शाखेने बुधवारी चांगलाच माज उतरवला. मंगळवारी केसांमध्ये हात फिरवत ऐटीत चालणाऱ्या तेजाचे बुधवारी मुंंडन करण्यात आले. शहरभर धिंड काढत कॅनॉट प्लेसला अक्षरश: गुडघ्यावर बसवले. सामान्यांसाठी त्रासदायक झालेल्या तेजाला रस्त्यावरून लंगडताना पाहून नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत केले.
११ ऑगस्ट रोजी तेजा २५ वर्षीय मैत्रिणीसोबत त्याच्या किलेअर्कच्या घरात होता. यावेळी अमली पदार्थांचा तस्कर, कुख्यात गुन्हेगार तालेब चाऊस, त्याचा मेहुणा सोहेल करीम सय्यद ऊर्फ सोनू मनसे, त्याची आई रेश्मा अंजुम सय्यद यांच्या समोर रात्री ९ वाजता त्याने मैत्रिणीवर गोळी झाडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. तेव्हा, तेजा नशेत तर्रर्र होता. पोलिस आल्याचे कळताच त्याची आई, मित्र, काकाच्या कुटुंबाने पोबारा केला. मंगळवारी तेजाला घटनास्थळी नेत असताना माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर त्याने आणखी चार मुलींना मारण्याची धमकी दिली होती.
गुडघ्यावर आला, लंगडत तोंड लपवत होता
बुधवारी दुपारी तेजाला पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासमोर हजर करण्यात आले. पवार यांनी त्याचा पाहुणचार केल्यानंतर त्याने हात जोडून माफी मागितली. त्यानंतर सर्वप्रथम पोलिसांनी त्याचे मुंडन केले. बेगमपुऱ्याचे सहायक निरीक्षक सुनिल लहाने, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे, अंमलदार राजेश यदमळ, शाम आडे, बाळू लहरे, नवनाथ खांडेकर, विजय निकम, सोमकांत भालेराव यांच्या पथकाने त्याला बेड्या ठोकून, तो राहत असलेला किलेअर्क परिसर, कॅनॉट प्लेस व बुढ्ढीलेनमध्ये धिंड काढली. यावेळी तो लंगडत तोंड लपवण्याचा प्रयत्न करत होता.
तर घर, वीज मीटची जोडणी तोडणार
पोलिसांनी तेजाची सर्व बाजूने काेंडी करणे सुरू केले आहे. महावितरण, महानगरपालिकेला त्याच्या वीज बिल, घराचे नियमन व करासंदर्भात माहिती मागवली आहे. ते अपूर्ण, नियमबाह्य असल्यास त्यावरही कठोर कारवाईसाठी पत्रव्यवहार करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, गोळीबारासाठी वापरलेले पिस्तुल त्याने राहत असलेल्या वाड्यातील सोफ्यात लपवले होते. उपनिरीक्षक विशाल बोडखे यांनी ते जप्त केले.