टेलिग्राम, स्नॅपचॅटद्वारे एमडी ड्रग्ज तरुणांच्या हातात; इंदूर व्हाया धुळे छत्रपती संभाजीनगरात तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 19:59 IST2025-11-25T19:58:26+5:302025-11-25T19:59:59+5:30
इंदूर व्हाया धुळे...छत्रपती संभाजीनगरात एमडी ड्रग्जची तस्करी; टेलिग्राम, स्नॅपचॅटद्वारे पुरवठा!

टेलिग्राम, स्नॅपचॅटद्वारे एमडी ड्रग्ज तरुणांच्या हातात; इंदूर व्हाया धुळे छत्रपती संभाजीनगरात तस्करी
छत्रपती संभाजीनगर : इंदूर व्हाया धुळे, मालेगावहून शहरात आता एमडी ड्रग्जची तस्करी सुरू झाली आहे. अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने रविवारी पडेगाव रोडवरील एका मैदानावर तीन तस्करांना रंगेहाथ पकडत ६१ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. आबूज अमर चाऊस (३०, रा. सहेदा कॉलनी), मोहम्मद इम्रान मोहम्मद यासीन (३५, रा. कटकट गेट) आणि समीर चांद खान ऊर्फ पप्पू (३४, रा. रहेमानिया कॉलनी), अशी अटकेतील तस्करांची नावे असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
काही महिन्यांपासून परराज्यांतून शहरात ड्रग्ज मागवून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विक्री होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या सूचनेवरून सहायक निरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांनी पडेगाव परिसरात सापळा रचला. रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गुप्त माहितीनुसार कार (एमएच ०५ एएक्स ३०३६) येताच पथकाने त्यांना पकडले. तेव्हा कारमध्ये ६१ ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले. पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली गच्चे, म्हस्के यांच्यासह अंमलदार लालाखान पठाण, नितेश सुंदर्डे, सतीश जाधव, विजय त्रिभुवन यांनी ही कारवाई केली.
महाविद्यालयीन विद्यार्थीच मुख्य ग्राहक
पोलिसांच्या चाैकशीत आरोपींनी महाविद्यालयीन विद्यार्थीच त्यांचे मुख्य ग्राहक असल्याची कबुली दिली. टेलिग्राम, स्नॅपचॅटमध्ये दोन्ही बाजूंचे संभाषण तात्पुरत्या स्वरूपात राहते. त्यामुळे या ॲपद्वारेच ड्रग्जची ऑर्डर दिली जात होती, असे आरोपींनी सांगितले. गेल्या चार महिन्यांपासून ही टोळी धुळे, मालेगावमधून ड्रग्जची तस्करी करत होती. इंदूरचा मुख्य तस्कर त्यांना माल पोहाेचते करून देत होता. यातील मोहम्मद इम्रान हा चालक असून, समीर ऊर्फ पप्पू खान हा गॅरेजवर काम करतो.