छत्रपती संभाजीनगरातील ५-स्टार हॉटेलमध्ये महिलेचा ओळख लपवून सहा महिन्यांपासून मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 12:10 IST2025-11-24T12:07:05+5:302025-11-24T12:10:21+5:30
खोटे आधार कार्ड, ‘यूपीएससी’ची बनावट निवड यादी महिलेकडून हस्तगत

छत्रपती संभाजीनगरातील ५-स्टार हॉटेलमध्ये महिलेचा ओळख लपवून सहा महिन्यांपासून मुक्काम
छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शहरातील एका महिलेने सहा महिन्यांपासून मुक्काम ठोकला होता. या महिलेचा मुक्काम संशयास्पद असल्याची माहिती सिडको पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांच्या पथकाने हॉटेलमध्ये धाव घेत चौकशी केल्यानंतर महिलेने उडवाउडवीची उत्तरे दिली. तिच्या खोलीची तपासणी केल्यानंतर २०१७ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची निवड यादी बॅगमध्ये सापडली. त्यातील ३३३ क्रमांकावर तिचे नाव होते. त्याशिवाय आधार कार्डवरही खाडाखोड केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून सिडको पोलिसांनी गुन्हा नोंदवत महिलेला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.
कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५, रा. चिनारगार्डनस, पडेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिस हवालदार सतीश बोर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटलमध्ये शनिवारी बंदोबस्तावर असतानाच एक महिला ३२२ रूम नंबरमध्ये संशायास्पदरीत्या वास्तव्याला असल्याची माहिती मिळाली. ही माहिती पोनि. येरमे यांना दिल्यानंतर त्यांनी हर्सूलच्या पोलिस निरीक्षक स्वाती केदार, सहायक निरीक्षक अरुणा घुले, वर्षा काळे यांच्यासह हॉटेलमध्ये धाव घेतली. हॉटेल व्यवस्थापकास गेस्ट रिसीप्टची लिस्ट मागितली. त्यात कल्पना भागवत ही महिला मागील सहा महिन्यांपासून वास्तव्यास असल्याचे समोर आले. त्यासाठी आयडी प्रूफ म्हणून दिलेल्या आधार कार्डमध्ये खाडाखोड केलेली होती. या महिलेची महिला पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून महिलेची सखोल चौकशी करण्यासाठी पंचाच्या उपस्थितीत रूमची झडती घेण्यात आली. तेव्हा बॅगमध्ये पाचपानी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे २०१७ सालचे नियुक्तीपत्रही आढळून आले. त्यातील यादीत ३३३ क्रमांकावर या महिलेचे नाव होते. याविषयी चौकशी केल्यानंतर त्यावर महिलेने उत्तर दिले नाही. ही यादीही बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवीत अटक करण्यात आली.
तीन दिवसांची पोलिस कोठडी
सिडको पोलिसांनी कल्पना भागवत हिच्या विरोधात गुन्हा नोंदवीत अटक केल्यानंतर रविवारी जिल्हा न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने २६ नाेव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.