बेशिस्त वाहनधारकांवर आता दखलपात्र गुन्हे दाखल होणार; छत्रपती संभाजीनगरात कडक मोहीम
By राम शिनगारे | Updated: May 23, 2023 17:59 IST2023-05-23T17:57:17+5:302023-05-23T17:59:56+5:30
राँगसाईड, विना हेल्मेट, ट्रीपलसीट नाही जमणार; आता वाहतुकीची शिस्त मोडणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई

बेशिस्त वाहनधारकांवर आता दखलपात्र गुन्हे दाखल होणार; छत्रपती संभाजीनगरात कडक मोहीम
छत्रपती संभाजीनगर : शहर वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्याच्या विरोधात धडक कारवाईची मोहिम सुरू केली आहे. ट्रीपल सीट, रॉगसाईड आणि विना हेल्मेट वाहनचालक पोलिसांच्या रडारवर आहे. १ मे पासून २२ मे पर्यंत तब्बल १० हजार ८८७ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यानंतरही आता वाहतुकीची शिस्त मोडणाऱ्यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हे नोंदविण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी सहायक पोलिस आयुक्त दिलीप गांगुर्डे यांनी दिली.
शहराच्या वाहतूकीत बेशिस्तपणा आलेला आहे. त्यात दुरुस्तीसाठी वाहतूक पोलिस वेळोवेळी सूचना देतात. त्या सूचनांकडे वाहनधारक कायम दुर्लक्ष करीत आहेत. राँगसाईड वाहने चालवू नका असे, सांगितल्यानंतर सेव्हनहिल, मोंढा नाका, क्रांतीचौक, जिल्हा कोर्ट, नतुन कॉलनी, खोकडपुरा, सिडको चौक, रेल्वेस्टेशन, उस्मानपुरा चौक यासह इतर ठिकाणी राँगसाईड आणि ट्रीपलसिट वाहने चालविली जातात. तसेच शहरात सर्रास विना हेल्मेट दुचाकी चालविण्यात येते. त्यामुळे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या सूचनेनुसार वाहतूक शाखेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. १ मे पासून ते २२ मे पर्यंत राँगसाईड, विना हेल्मेट आणि ट्रीपलसीट वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामध्ये २२ दिवसात १० हजार ८८७ केसेस करण्यात आल्या. त्यानुसार ८० लाख ५५ हजार रूपयांचा दंड वाहतूक विभागाने आकारला आहे. शहरावासीयांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, राँगसाईड वाहने चालवून नये, ट्रीपलसीट आणि विना हेल्मेट दुचाकी चालविल्यास वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रभारी सहायक पोलीस आयुक्त दिलीप गांगुर्डे यांनी केले आहे.
— CP Chhatrapati Sambhajinagar Police (@CSNCityPolice) May 22, 2023
वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी
वाहतुक विभागाचा नियमीत आढावा घेण्यात येत आहे.आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती केली जात आहे. त्याशिवाय सिंग्नल दुरुस्तीसह इतर प्रकारच्या अडचणी सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेऊन मार्ग काढला जाईल. येत्या काही दिवसात शहरातील वाहनधारक नियमांचे उल्लंघन करणार नाहीत, त्यादृष्टीने तयारी करण्यात येत आहे.
- मनोज लोहिया, पोलिस आयुक्त