छ. संभाजीनगरात ऑफरमुळे दुकानात झुंबड, ३ महिलांना चक्कर; दुकान मालकांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 19:54 IST2026-01-06T19:54:45+5:302026-01-06T19:54:59+5:30
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून दखल : चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावणार

छ. संभाजीनगरात ऑफरमुळे दुकानात झुंबड, ३ महिलांना चक्कर; दुकान मालकांवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : कोणतेही सुरक्षा उपाययोजना न करता कपड्यांच्या खरेदीवर आकर्षक सूट घोषित केल्याने दुकानात झुंबड चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण होऊन तीन महिला बेशुद्ध पडल्या. याप्रकरणी बेजबाबदारपणा करणाऱ्या दुकान मालक कृष्णा रघुनाथ देशमुख (३०, रा. सातारा देवळाई परिसर) व संजय ललवाणी या दोघांवर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आकाशवाणी परिसरात टेंज द फॅशन वर्ल्ड हे कपड्याचे दुकान रविवारी सुरू झाले. दुकानाच्या उद्घाटनापूर्वी दुकान मालकांनी सोशल मीडियात विविध रिल्सच्या माध्यमातून किरकोळ दरात कपड्याची विक्री होणार असल्याची जाहिरात केली. या आकर्षक जाहिरातीला भुलून शेकडोंनी रविवारी सकाळीच फ्रिडम टॉवर्सच्या परिसरात गर्दी केली. दुकानात जाण्यासाठी एकच शटर असून, आतमध्ये मोठ्या संख्येने नागरिक गेल्यामुळे उभे राहण्यासही जागा नव्हती. त्याशिवाय नागरिकांनी दुकानात गेल्यानंतर प्रत्येक वस्तू उचलून घेतल्याने गोंधळ उडून चेंगराचेंगरी झाली. दुकानासह बाहेरही शेकडोंचा जमाव जमला. यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. चेंगराचेंगरीत चक्कर आलेल्या महिलांना सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुकानचालकाच्या बेजबाबदारपणावर संताप
ऐन निवडणुकीत घडलेल्या या प्रकारामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुकानचालकाच्या बेजबाबदारपणावर संताप व्यक्त केला. पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. पोलिस अंमलदार पुंडलिक मानकापे यांच्या तक्रारीवरून कृष्णा देशमुख व संजय ललवाणीवर कारवाई करण्यात आली. दोघांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक कुंभार यांनी सांगितले.
काय ठेवलाय ठपका?
आरोपींना मोठी सूट घोषित करताना लहान व अपुऱ्या जागेत गर्दी होऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते, याची कल्पना होती. तरीही त्यांनी दुकानाजवळ रुग्णवाहिका, फिरते शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आपत्कालीन मार्ग अशी कुठलीच उपाययोजना केली नाही. त्यांच्या हलगर्जीपणामुळे जमलेली गर्दी व गोंधळामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊन व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आली. तसेच शहरात मनपा निवडणूक असल्याने आचारसंहिता, पोलिस आयुक्तांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला.