दिल्ली बॉम्बस्फोटादरम्यान तोतया आयएएस महिला अधिकाऱ्याचे दिल्लीत वास्तव्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:00 IST2025-11-28T11:59:10+5:302025-11-28T12:00:41+5:30

महाराष्ट्र सदनमध्ये अनेकदा मुक्काम; अफगाणिस्तान, पाकिस्तानसोबत सौदी अरेबिया आणि बांग्लादेशचे नव्याने संपर्क क्रमांक समोर

Impersonator IAS woman officer Kavita Bhagwat stayed in Delhi during Lal Killa blasts! | दिल्ली बॉम्बस्फोटादरम्यान तोतया आयएएस महिला अधिकाऱ्याचे दिल्लीत वास्तव्य !

दिल्ली बॉम्बस्फोटादरम्यान तोतया आयएएस महिला अधिकाऱ्याचे दिल्लीत वास्तव्य !

छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी देशाला हादरवून टाकलेल्या दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील बॉम्बस्फोटादरम्यान शहरातील तोतया आयएएस महिला अधिकारी कल्पना भागवत हिचेदेखील दिल्लीत वास्तव्य असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच दरम्यान, तिच्या मोबाइलमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया व बांग्लादेशच्या व्यक्तींच्या नावे क्रमांक सेव्ह असल्याचे नव्याने समोर आले. केंद्रीय तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचे केंद्रीय गुप्तचर खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

रविवारपासून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कल्पनाची सध्या सिडको पोलिसांसह गुप्तचर यंत्रणा, एटीएसकडून कसून चौकशी सुरू आहे. बुधवारी तिच्या पोलिस कोठडीत १० दिवसांची वाढ झाली. पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत तिची कसून चौकशी केली. एटीएस, गुप्तचर यंत्रणांनी दोन तास चौकशी केली. सायंकाळी पुन्हा सर्वांनी एकत्रित चौकशी करीत तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझ्या खूप ओळखी आहेत, अनेक देशांत माझ्या परिचयाची माणसे, अधिकारी आहेत, असे ती सांगते. तपास यंत्रणांनी आता तिच्या प्रत्येक उत्तराची खातरजमा करणे सुरू केले आहे. पोलिस निरीक्षक अतुल येरमे, सहायक निरीक्षक योगेश गायकवाड अधिक तपास करत आहेत.

देशभरातील तोतया आयएएस अधिकाऱ्यांचे सिंडिकेट ?
कल्पनाच्या मोबाइलमध्ये अनेक मोबाइल क्रमांकांसोबत केेंद्रीय गृहमंत्र्यांचे ओएसडी म्हणून अभिषेक चौधरी नावाने नंबर सेव्ह आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्याची माहिती काढली जात होती. दिल्लीकडून प्राप्त माहितीनुसार, सदर व्यक्तीने मंत्र्यांच्या ओएसडीच्या नावाचा वापर करून त्यानेही अधिकारी असल्याचा बनाव रचल्याचा अंदाज आहे. त्यामुळे कल्पना व अशा अनेक तोतया अधिकाऱ्यांचे सिंडिकेटच ऑपरेट होत असल्याचा कयास आहे. कल्पनाच्या दाव्यानुसार, त्याची आणि तिची दिल्लीत वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. तो उत्तर भारतीय असल्याचे समोर आले.

सौदी अरेबिया, बांग्लादेशचेही संपर्क क्रमांक
कल्पनाच्या मोबाइलमध्ये बुधवारी पाकिस्तानच्या अफगाण ॲम्बॅसी, पेशावर कँटॉन्मेंट बोर्ड, झरदारी सर वाइफ, अफगाणिस्तान ॲम्बॅसी, मुजीबभाई, झरदारी सर, मोहम्मद रजा व नक्वी असे ११ क्रमांक आढळल्याने तपास यंत्रणा हादरून गेल्या. मात्र, आता तिच्या मोबाइलमध्ये सौदी अरेबिया, बांग्लादेशच्याही अनेकांच्या नावाने क्रमांक असल्याचे गुरुवारी समोर आले. त्याविषयीही कल्पना गोलमाल उत्तर देते.

२०२१ मध्ये विद्यापीठातून बडतर्फ
बी. एस्सी. पदवीधर कल्पनाने महाविद्यालयीन काळात एमपीएससी, यूपीएससी परीक्षेची तयारी केली होती. एकदा तिने यूपीएससीची पूर्वपरीक्षादेखील दिली व उत्तीर्ण केली होती. त्याच दरम्यान तिने एम. एस्सी.ला प्रवेश घेऊन ते अर्धवट सोडले. त्यानंतर २०१३मध्ये विद्यापीठाच्या भरतीमध्ये ती लिपिक म्हणून रुजू झाली. मात्र, अचानक गैरहजर राहिली. २०२१मध्ये तिला विद्यापीठ प्रशासनाने बडतर्फ केले. त्यानंतर तिने स्वत:ला आयएएस अधिकारी म्हणून मिरवण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेकदा दिल्लीत जाऊन तिने महाराष्ट्र सदनमध्ये मुक्काम ठाेकला. तेथे ती अनेकांच्या भेटी घेत होती. याच छबीचा आधार घेत ती शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या संपर्कात आल्याचेही पोलिस तपासात समाेर आले.

दिल्लीत वास्तव्य, योगायोग की...
१० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनजवळ उभ्या कारमध्ये जोरदार स्फोट झाला. यात १० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू, तर २० हून अधिक लोक जखमी झाले. याच दरम्यान कल्पनाचा दिल्लीत प्रवास झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक तपासात कल्पनाने पाचवेळा विमानप्रवास केला. त्यापूर्वी अनेकदा राजस्थानमध्येही ती गेली होती. दिल्लीतील वास्तव्यादरम्यान कल्पनाला अनेकदा महाराष्ट्र सदनमध्ये पाहण्यात आले. बॉम्बस्फोटाच्या दरम्यानच कल्पनाचे दिल्लीतील वास्तव्य योगायोग होता की आणखी काही, या दिशेने दिल्लीस्थित गुप्तचर यंत्रणा तपास करत आहेत. शिवाय, तिने एक मोबाइलही नष्ट केल्याचा संशय आहे. शहर पोलिसांनी मात्र हा तपासाचा भाग असून वरिष्ठ पातळीवरून याबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगून याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला.

Web Title : दिल्ली बम विस्फोट के दौरान नकली आईएएस अधिकारी का दिल्ली में निवास संदिग्ध

Web Summary : नकली आईएएस अधिकारी कल्पना भागवत बम विस्फोट के दौरान दिल्ली में थी। उसके फोन में पाकिस्तान, अफगानिस्तान, सऊदी अरब और बांग्लादेश के नंबर मिले। अधिकारियों को नकली आईएएस सिंडिकेट का संदेह है। गृहमंत्री के ओएसडी बनकर धोखा देने वाले एक व्यक्ति से उसके संबंधों की जांच हो रही है।

Web Title : Fake IAS Officer's Delhi Stay During Bomb Blast Raises Suspicion

Web Summary : A fake IAS officer, Kalpana Bhagwat, was in Delhi during the bomb blast. Her phone contained numbers from Pakistan, Afghanistan, Saudi Arabia and Bangladesh. Authorities suspect a fake IAS syndicate. Her links to a man posing as a Home Minister's OSD are under investigation, alongside her past at a university.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.