बोगस आयएएस कल्पनाने माजी कुलगुरूंचा कमावला विश्वास, मग प्रशस्तिपत्र घेत पैसेही उकळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:11 IST2025-12-03T12:10:16+5:302025-12-03T12:11:43+5:30
तोतया महिला आयएएस अधिकारी कल्पना भागवतचा नवा घोटाळा समोर, नागपूरमध्ये कुलगुरूंनी कल्पनाचा सत्कारही केला

बोगस आयएएस कल्पनाने माजी कुलगुरूंचा कमावला विश्वास, मग प्रशस्तिपत्र घेत पैसेही उकळले
छत्रपती संभाजीनगर : तोतया महिला आयएएस अधिकारी कल्पना भागवतने चक्क माजी कुलगुरूंकडूनच आयएएस असल्याचे सांगून पैसे उकळल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. याप्रकरणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा माजी उच्च शिक्षण संचालक डॉ. शहाबुद्दीन नसिरुद्दीन पठाण यांचा सिडको पोलिसांकडून मंगळवारी रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदवणे सुरू होते.
दोन दिवसांपासून तपास यंत्रणा तोतया महिला आयएएस अधिकारी कल्पना भागवत (४६, रा. पडेगाव), केंद्रीय मंत्र्यांचा ओएसडी म्हणून मिरवणारा डिम्पी देवेंद्रकुमार हरजाई (३०, रा. दिल्ली) आणि अशरफची कसून चौकशी करीत आहेत. तिघे संपर्कात कसे राहायचे, किती वेळा भेटले, अशरफने त्याचा भाऊ गिल याला कल्पनाच्या संपर्कात का आणले, त्यामागे त्याचा उद्देश काय होता, या मुद्यांभोवतीच अद्यापही तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यासाठी अशरफच्या मोबाइलचा सातत्याने सायबरतज्ज्ञांसह फॉरेन्सिक विभागाकडून तपास सुरू आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.
चौघांचा जबाब नोंदवला, भाडे बुडवलेल्या घरमालकाचाही समावेश
कल्पनाच्या संपर्कात असलेल्या २८ जणांना तपास पथकाने आतापर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. आतापर्यंत ज्यांच्या नावे धनादेश सापडले, त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. मंगळवारी कल्पना काही दिवस भाडेतत्त्वावर राहिलेले घरमालक ठाण्यात हजर झाले. पडेगावव्यतिरिक्त कल्पनाने २५ हजार रुपये भाडे असलेले आलिशान घर भाड्याने घेतले होते. मात्र, आयएएस असल्याचे सांगून तिने भाडे थकवले होते. तिच्या या वागण्याला कंटाळून तिला घर सोडण्यास सांगितल्याचे सदर घरमालकाने पोलिसांना सांगितले.
पठाण म्हणतात, माझीच फसवणूक
कल्पनाकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू पठाण यांनी दिलेले आयएएस अधिकारी म्हणून प्रशस्तिपत्र मिळून आले. त्यावरून पठाण यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. मंगळवारी सायंकाळी पठाण ठाण्यात हजर झाले. रात्री १०:३० वाजेपर्यंत त्यांचा जबाब नोंदवणे सुरू होते. त्यांच्या माहितीनुसार, पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांची व कल्पनाची ओळख झाली. पहिल्याच भेटीत तिने त्यांना मी आयएएस असल्याचे सांगितले होते. विविध ओळखी सांगितल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यावरून एका कार्यक्रमात त्यांनी तिला प्रशस्तिपत्र दिले. त्यानंतर विविध कारणे सांगून तिने पठाण यांच्याकडून ८० हजार ते १ लाख रुपये घेतल्याचेही पठाण यांनी सांगितले.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी घेतला आढावा
रजेवर असलेले शहराचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार सोमवारी रुजू झाले. मंगळवारी त्यांनी सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल येरमे, सहायक निरीक्षक योगेश गायकवाड यांच्याकडून गुन्ह्याच्या तपासाचा आढावा घेतला. यात तपासाच्या अनुषंगाने महत्त्वपर्ण सूचना केल्या. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सायबरचे सोमनाथ जाधव यांना तपासात सहभागी होत धागेदाेरे तपासण्याचा आदेश दिला. त्यानंतर कल्याणकर, जाधव यांनी सायंकाळी सिडको ठाण्यात जात चौकशी केली.