सूचना कागदावरच ठेवायच्या असतील तर बैठका घेता कशाला ? मनपा, महावितरणवर संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 19:39 IST2025-04-11T19:38:46+5:302025-04-11T19:39:26+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शांतता समिती बैठकीत मनपा, महावितरणवर संताप

सूचना कागदावरच ठेवायच्या असतील तर बैठका घेता कशाला ? मनपा, महावितरणवर संताप
छत्रपती संभाजीनगर : जयंती उत्सव आले की शांतता समिती बैठकीत समाजबांधवांकडून सूचना घेतल्या जातात; पण महानगरपालिका, महावितरणकडून एकाही सूचनेची दखल घेतली जात नाही. उत्सवात ना पिण्याचे पाणी मिळते, ना महिलांसाठी मोबाइल टॉयलेटची सोय होते. ठिकठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत असतात. मिरवणूक मार्गावर अंधार असताे. तुम्हाला सूचना कागदावरच ठेवायच्या असतील, तर बैठका घेता कशाला, असा थेट प्रश्न करत आंबेडकरी अनुयायांनी मनपा, महावितरणच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी दुपारी पोलिस आयुक्तालयात शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जयंती उत्सवात एवढा जनसागर एकत्र येतो. मात्र, आजपर्यंत कधीही जयंती उत्सवाला गालबोट लागलेले नाही. यंदाचा जयंती उत्सवदेखील शांततेत, विविध सामाजिक कार्यक्रमांसह आदर्शवत असेल, असे आश्वासन समाजातील प्रमुख नेते व जयंती समितींनी पाेलिस प्रशासनाला दिले. यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे, शीलवंत नांदेडकर, प्रशांत स्वामी यांच्यासह समाजातील विविध नेते, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
नागरिकांकडून या प्रमुख सूचना :
-क्रांती चौक ते भडकल गेट या मुख्य मिरवणूक मार्गावर फिरते शौचालय, पिण्याच्या पाण्याचे टँकर व रुग्णवाहिका असावी.
-लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांची दुरुस्ती करून उंची वाढवावी.
-मार्गावरील व्यापारी, विक्रेत्यांनी दुकान बंद केल्यानंतरही बाहेरील लाइट सुरू ठेवावे.
-चिकलठाणा, टी.व्ही. सेंटर, आंबेडकर चाैक, नंदनवन कॉलनीत वाहतूक नियोजनासाठी पोलिस नियुक्त असावेत.
-अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी. मिरवणुकीत मद्यपी आढळल्यास कठोर कारवाई करावी.
-शनिवार, रविवारीदेखील परवाना एक खिडकी योजना सुरू ठेवावी.
पोलिसांच्या सूचना
-कर्कश आवाजात डीजेवर आक्षेपार्ह गाणी वाजवू नयेत. पारंपरिक वाद्यांवर भर द्यावा.
-कुठलीही बाब, सूचना नेत्यांनी सामंजस्याने घ्यावी. कार्यकर्त्यांना शांत राहण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
-वाहतुकीत अडथळा निर्माण होईल, असे स्टेज उभारू नका. वेळेची मर्यादा पाळावी.
आयुक्तांनी मनपा, महावितरणचे कान टोचले
बैठकीत प्रामुख्याने मनपा, महावितरणबाबतच सूचना केल्या गेल्या. मात्र, त्याची पूर्तता होत नसल्याने संतापही व्यक्त झाला. यावरून पोलिस आयुक्त पवार यांनी देखील मनपा, महावितरणचे कान टोचले. नागरिकांच्या सूचनांची अवहेलना होऊ देऊ नका. त्या गांभीर्याने घ्या. तुमच्या प्रत्येक सूचनेची पूर्तता होईल. मी स्वत: मनपा प्रशासक व महावितरणच्या प्रमुखांशी पत्रव्यवहार करून सर्व अडचणी दूर करतो, असे आश्वासन पवार यांनी उपस्थितांना दिले. दरम्यान, महावितरणतर्फे एकही अधिकारी बैठकीला उपस्थित नव्हता.