‘राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत, तर महायुती तोडू शकतो’: सतीश चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 15:18 IST2025-06-28T15:18:21+5:302025-06-28T15:18:53+5:30

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संघटन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजप-शिंदे गटाच्या तुलनेत फारसे मजबूत नाही.

'If NCP does not get respectable seats, we can break the grand alliance': Satish Chavan | ‘राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत, तर महायुती तोडू शकतो’: सतीश चव्हाण

‘राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत, तर महायुती तोडू शकतो’: सतीश चव्हाण

छत्रपती संभाजीनगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीमध्येराष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या, तर ठीकच आहे, अन्यथा पक्ष म्हणून आम्ही लढू आणि स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास या पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आ. सतीश चव्हाण यांनी व्यक्त केला.

त्यांनी सांगितले की, अध्यक्ष झाल्याबरोबर पाच तालुक्यांचा दौरा केला. लवकरच उर्वरित तालुक्यांचा दौरा करणार आहे. पदवीधर आमदार असतानाही तुम्ही ही अतिरिक्त जबाबदारी स्वीकारली, यावर ते म्हणाले, त्यात काय झाले ? पूर्वीही मी काम करत होतोच. सतीश चव्हाण यांनी गंगापूर विधानसभा लढवली होती. तिथे त्यांना जी मते मिळाली होती, त्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा मिळायला हव्यात, असे त्यांना वाटते. त्यामुळे आगामी निवडणुकीत ते गंगापूर- खुलताबाद तालुक्यावर विशेष लक्ष देणार असल्याचे दिसते.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संघटन जिल्ह्यात भाजप-शिंदे गटाच्या तुलनेत फारसे मजबूत नाही. तीन वेळा मराठवाडा पदवीधर आमदार राहिलेल्या व मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळासारख्या मराठवाड्यातील मोठ्या संस्थेचे सरचिटणीस असलेल्या सतीश चव्हाण पक्ष संघटना मजबूत करण्याचे आव्हान कसे पेलवतात, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ते कसा परफॉर्मन्स दाखवतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. माजी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांची वर्णी आता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर उपाध्यक्ष म्हणून लागली आहे. शिवाय ते गंगापूरचे आहेत. त्यांची साथ चव्हाण यांना पक्षशिस्तीचा एक भाग म्हणून मिळते का, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: 'If NCP does not get respectable seats, we can break the grand alliance': Satish Chavan