इंजिनिअर जेम्स प्रिन्सेप नसते तर ‘धम्मलिपी’ आणि सम्राट अशोक जगासमोर आले नसते
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 17:03 IST2025-08-21T17:02:11+5:302025-08-21T17:03:27+5:30
जेम्स प्रिन्सेप हे ब्रिटिश इंजिनिअर असूनही त्यांनी धम्म लिपी संशोधनाचे अमूल्य कार्य केले

इंजिनिअर जेम्स प्रिन्सेप नसते तर ‘धम्मलिपी’ आणि सम्राट अशोक जगासमोर आले नसते
छत्रपती संभाजीनगर : जेम्स प्रिन्सेप यांचे लिपी संशोधन नसते, तर सम्राट अशोक यांच्यासारखा महान राजा व त्यांचे धम्म विचार जगासमोर आले नसते. जवळपास २२०० वर्षे लोकांना असा सम्राट अस्तित्वात असल्याचा पत्ताच नव्हता. जेम्स यांचे संशोधन ही भारतीय व बौद्ध धम्मासाठी गौरवाची बाब आहे, असे प्रतिपादन इंजि. भास्कर म्हस्के यांनी केले.
जेम्स प्रिन्सेप हे इंजिनिअर असूनही त्यांनी भारताच्या इतिहासातील लिपी संशोधनाचे अमूल्य कार्य केले. भारताच्या शिलालेखांचा आणि सम्राट अशोकांच्या ‘धम्मलिपी’चा जगास परिचय करून देणारे महान संशोधक जेम्स प्रिन्सेप यांना २२६व्या जयंतीनिमित्त साकेत बुद्ध विहारात अभिवादन करण्यात आले. यावेळी म्हस्के बोलत होते.
पुढे बोलताना म्हस्के म्हणाले, जेम्स प्रिन्सेप हे केवळ एक अभियंता नव्हते, तर ते एक कुशल कलाकार आणि जिज्ञासू संशोधक होते. १८१९ मध्ये भारतात आल्यावर त्यांनी सुरुवातीला वाराणसीतील इमारतींचे डिझाईन, सांडपाण्याची व्यवस्था आणि जुन्या वास्तूंची दुरुस्ती यासारखी अनेक कामे केली. वाराणसीतील टांकसाळीसाठी अचूक तापमान मोजण्याचे उपकरण आणि ०.१९ ग्रॅम वजनाचे तराजू यांसारखी आधुनिक साधने त्यांनी तयार केली. मात्र, त्यांचे खरे कार्य प्राचीन लिपींच्या शोधातून उघड झाले. प्रिन्सेप यांना प्राचीन नाण्यांवर आणि शिलालेखांवर कोरलेली अक्षरे नेहमी आकर्षित करत होती. त्यांनी ओरिसातील खडकांवरील आणि बिहारमधील बेतिहा येथील शिलालेखांचे ठसे मिळवून त्यांचा अभ्यास सुरू केला. त्यावेळी भारतातील अनेक संस्कृत पंडितांनाही ही अक्षरे वाचता येत नव्हती. पण प्रिन्सेप यांनी हार मानली नाही. त्यांनी बॅक्टेरिया आणि कुषाण राजांच्या इंडो-ग्रीक नाण्यांचा अभ्यास करून ‘खरोष्ठी’ या प्राचीन लिपीचा शोध लावला.
धम्मलिपिचा शोध: ‘देवानांपिय पियदस्सिन’ ते ‘सम्राट अशोक’
जेम्स प्रिन्सेप यांच्या या संशोधनामुळे अनेक ऐतिहासिक वस्तू आणि शिलालेख त्यांच्याकडे पाठवले जाऊ लागले. त्यांनी अनेक शिलालेखांचा अभ्यास करताना 'दानं' हा शब्द अनेक ठिकाणी शेवटी आलेला आढळला आणि त्यावरून त्यांनी या लिपीचे पहिले अक्षर ओळखले. अखेर १८३७ मध्ये त्यांनी भारतीय शिलालेखांमधील अक्षरे वाचण्यात यश मिळवले. अनेक शिलालेखांवर त्यांना वारंवार ‘देवानांपिय पियदस्सिन’ हा शब्द आढळून आला. सुरुवातीला त्यांना वाटले की हा श्रीलंकेचा राजा असावा, कारण महावंस या ग्रंथात तसा उल्लेख होता. पण श्रीलंकेच्या राजाचे शिलालेख भारतात का असतील, या प्रश्नाने ते अस्वस्थ झाले. सहा आठवड्यांच्या अथक परिश्रमानंतर, श्रीलंकेतील त्यांच्या मित्राने पाठवलेल्या पाली भाषेतील काही संदर्भ ग्रंथांच्या मदतीने त्यांनी 'देवानांपिय पियदस्सिन' हे नाव सम्राट अशोकांचेच आहे हे सिद्ध केले. या एका शोधाने भारतीय आणि जागतिक इतिहासाची दिशा बदलली. जवळपास २२०० वर्षांपासून विस्मृतीत गेलेल्या मौर्य साम्राज्याच्या सर्वात महान सम्राटाचा इतिहास जगासमोर आला. प्रिन्सेप यांनीच धम्मलिपीमधील शिलालेखांच्या अभ्यासातून सम्राट अशोकांचे न्याय, नीती आणि लोककल्याणकारी शासन जगाला दाखवले. १९१५ मध्ये कर्नाटकातील मस्की येथे सापडलेल्या शिलालेखावर ‘अशोक’ असे स्पष्ट नाव आढळल्यावर प्रिन्सेप यांच्या निष्कर्षांची अचूकता सिद्ध झाली आणि त्यांच्या कार्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली.
पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा
जेम्स प्रिन्सेप यांनी केवळ धम्मलिपीचा शोध लावला नाही, तर त्यांनी भारतीय संस्कृतीतील अनेक अज्ञात गोष्टी उघड केल्या. त्यांचा हा शोध भारतीयांसाठी आणि विशेषतः बौद्ध धम्माच्या अनुयायांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, असेही भास्कर म्हस्के म्हणाले. तसेच त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जेम्स प्रिन्सेप आणि लॉर्ड कॅनिंगहॅम यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा गौरव विहारांमध्ये व्हायला हवा, कारण त्यांनीच बौद्ध धम्माची खरी माहिती पुन्हा एकदा जगासमोर आणली. यावेळी भंते श्रद्धारक्षित यांनीही प्रिन्सेप यांच्या योगदानावर भाष्य केले. या कार्यक्रमाला साकेत बुद्ध विहार समितीचे सदस्य आणि अनेक उपासक-उपासिका उपस्थित होते.