'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:23 IST2025-10-03T13:21:04+5:302025-10-03T13:23:03+5:30
मराठा आरक्षणाच्या विरोधात स्वार्थी नेते; 'तुमचा संपूर्ण समाज मराठाद्वेषी नाही,' मनोज जरांगेंनी साधला निशाणा

'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
छत्रपती संभाजीनगर: माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी झालेल्या दसरा मेळाव्यात मराठा आरक्षणावर बोलत त्यांना ओबीसीमधून नव्हे तर वेगळे आरक्षण द्या अशी मागणी केली होती. यामुळे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा एकेरी उल्लेख करीत ते म्हणाले, तुला क्लिअर सांगतो. शहाणपणा करू नको, मी दादा (अजित पवार) मोजत नसतो. माझ्या नादी लागला तर तुझ्यासह अजित पवार यांचाही राजकीय करिअरचा देव्हारा करीन, असा थेट इशाराच जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सकाळी येथे दिला.
प्रकृती खालावल्यामुळे शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकारने उभे राहणं गरजेचे आहे. मात्र केवळ हेक्टरी ५० हजार रुपये मदत देऊन काय होणार आहे, त्यांची जनावरे मेली, त्यांच्या जमिनी खरवडून निघाली आणि घरादारात पाणी शिरल्याने सर्वस्व गेले आहे. अशा परिस्थितीत त्यांना पुन्हा उभं राहता येईल अशी मदत दिवाळीपूर्वी द्यावी अशी आमची मागणी आहे. अन्यथा शेती विचारवंताशी बोलून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठं राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला. एकाही मंत्र्याला राज्यात फिरता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
तीन समाजाचे स्वार्थी नेते मराठाद्वेषी
माळी, धनगर व वंजारी समाजाचे नेते स्वार्थी राजकारणापोटी मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. मात्र हे नेते म्हणजे त्यांचा संपूर्ण समाज होत नाही. परिमाणी आज गावांत मराठा आणि ओबीसी समाजात कोणतेही वाद नसल्याचे जरांगे यांनी सांगितले.
नोंदीची यादी प्रत्येक ग्रामपंचायतीत लावा
आजपर्यंत ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांची यादीच ग्रामपंचायतीत लावावी, मराठा आरक्षण आंदोलकांवरील सर्व गुन्हे तातडीने परत घ्यावी, हैदराबाद गॅझेटिअरट प्रमाणे अर्ज स्वीकारुन प्रमाणपत्र द्यायला सांगा,अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.