'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 18:39 IST2025-12-03T18:31:55+5:302025-12-03T18:39:40+5:30
कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार आणि पाकिस्तान-अफगाणिस्तान कनेक्शन यामुळे देशभरात चर्चा

'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
छत्रपती संभाजीनगर: सहा महिन्यांपासून पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम, कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार आणि पाकिस्तान-अफगाणिस्तान कनेक्शन यामुळे देशभरात चर्चेत आलेली 'बोगस आयएएस' कल्पना भागवत अखेर कोर्टात आणले असता माध्यमांसमोर सगळंच बोलली. हे प्रकरण केवळ स्थानिक फसवणुकीपुरते मर्यादित नसून, अफगाणी रेफ्यूजी तरुण आणि पाकिस्तान कनेक्शनमुळे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याने आता राष्ट्रीय पातळीवरील तपास यंत्रणांनीही यात लक्ष घातले आहे.
या प्रकरणात ठाकरेसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव आर्थिक व्यवहारातून समोर आल्याने मोठी खळबळ उडाली असतानाच, कल्पना भागवतने माध्यमांसमोर येऊन अनेक खुलासे केले. पोलिसांनी कोर्टात हजर केलेले असताना कल्पना भागवतने कायद्याचे उल्लंघन करत माध्यमांसमोर अनेक दावे केले.
खासदारांना 'भाऊ' सांगितले
खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडून घेतलेल्या १ लाख ४५ हजार रुपयांबाबत विचारणा झाल्यावर तिने थेट, "नागेश पाटील आष्टीकर माझे भाऊ आहेत, त्यांनी मला मदत केली," असे सांगितले. यामुळे 'माणुसकीच्या' मदतीचे स्वरूप कौटुंबिक होते की नाही, यावर नवा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
'१९ कोटींचा' चेक...
तिच्याकडे सापडलेल्या धनादेशावर ती म्हणाली, "१९ कोटींचा चेक मला WhatsApp वर आला होता, तो मी फक्त प्रिंट केला आहे."
अफगाण मित्र:
अफगाणिस्तान कनेक्शनबाबत तिने "अफगाणचा अक्षरफ माझा मित्र आहे," असे स्पष्ट केले.
खोटे काम केलं नाही
"मी खोटे काम केले नाही हे मला माहिती नाही" आणि "पद्मश्री पुरस्कार देण्याच्या आमिषाने फसविण्याइतकी मी मोठी असामी नाही," असे म्हणत कल्पनाने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
सुरक्षा यंत्रणांचे चक्रं गतिमान
कल्पना भागवतचा अफगाणिस्तानी मित्र, पाकिस्तानातील त्याचा भाऊ आणि तिचे बनावट कागदपत्रे तसेच आर्थिक व्यवहार यामुळे सुरक्षा यंत्रणांची चक्रं वेगाने फिरत आहेत. दरम्यान, लाल किल्ला स्फोटाच्या दरम्यान कल्पना भागवत दिल्लीत होती, या माहितीमुळे प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे. तिच्याकडे सापडलेले बनावट आयएएस कागदपत्रे, आधार कार्डातील फेरफार आणि स्थानिक नेत्यांची नावे या सगळ्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे कोठे पोहोचतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.