हैदराबाद गॅझेटचा प्रभाव! मराठवाड्यात दोन महिन्यांत १७ हजार ९४६ नवीन कुणबी दाखले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:24 IST2025-11-13T16:20:28+5:302025-11-13T16:24:06+5:30
मराठवाड्यात आतापर्यंत एकूण २ लाख ५६ हजार कुणबी प्रमाणपत्रधारक

हैदराबाद गॅझेटचा प्रभाव! मराठवाड्यात दोन महिन्यांत १७ हजार ९४६ नवीन कुणबी दाखले
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील विविध शासकीय खात्यांतर्गत २ कोटी २१ लाख ६० हजार ८८९ दस्तऐवज तपासल्यानंतर २ लाख ५६ हजार ५०५ जणांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली. १ ऑक्टोबर २०२३ ते ११ नोव्हेंबर २०२५ पर्यंत या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. १ हजार ८८४ गावांतील सर्व प्रकारच्या नोंदी तपासल्या. २ सप्टेंबरनंतर विभागात १७ हजार ९४६ प्रमाणपत्रे नव्याने दिली. ३६८ गावांमध्ये ६१० नव्याने नोंदी सापडल्या.
मराठवाड्यातील ८५५० पैकी १८१४ गावांत कुणबी नोंदी आढळल्या. शासनाने २ सप्टेंबरला एक अध्यादेशाद्वारे हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ज्या गावांत नोंदी आढळल्या नाहीत, तेथील मराठा समाजबांधवांना तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक या गावपातळीवरील समितीमार्फत १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वी संबंधित क्षेत्रात रहिवासी असल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर प्रमाणपत्रे दिली जात आहेत. समिती व सक्षम अधिकारी जात प्रमाणपत्र अर्जासंबंधी चौकशीनंतर जातीचा दाखला देत असल्याचा दावा प्रशासन करीत आहे.
२ सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय झाल्यानंतर ३६८ गावांत कुणबी नोंदी सापडल्या. २ सप्टेंबरपूर्वी १ हजार ५१६ गावांत नोंदी सापडल्या. १७ हजार ९४६ प्रमाणपत्रे मागील अडीच महिन्यांत नव्याने दिली. २ सप्टेंबरपर्यंत २ लाख ३८ हजार ५५९ कुणबी प्रमाणपत्रे दिली होती. ११ नोव्हेंबरपर्यंत २ लाख ५६ हजार ५०५ प्रमाणपत्रे दिल्याचा आकडा प्रशासनाने कळविला.
२ कोटी २१ लाख ६० हजार दस्तऐवज चाळले
संयुक्त महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विलीन झाल्यानंतर पहिल्यांदाच विभागातील १३ प्रकाराचे २ कोटी २१ लाख ६० हजार ८८९ दस्तऐवज तपासले गेले.
किती कुणबी नोंदी सापडल्या? ४८ हजार ४५५
किती कुणबी प्रमाणपत्रे दिली?
१ ऑक्टोबर २०२३ ते २२ ऑगस्ट २०२५ पर्यंत २ लाख ३८ हजार ५५९ कुणबी प्रमाणपत्रे दिली.
२ सप्टेंबर २०२५ ते ११ नोव्हेंबर २०२५ पर्यंत १७ हजार ९४६ प्रमाणपत्रे नव्याने दिली.
मराठवाड्यात आजवर एकूण २ लाख ५६ हजार ५०५ प्रमाणपत्रे दिली.
किती प्रमाणपत्रे ठरली वैध? ८ हजार ५००
पडताळणी समितीकडे किती अर्ज शिल्लक? ७०१
प्रमाणपत्र अवैध ठरविण्याची कारणे
जात नोंद पुरावे सादर न करणे, वंशावळ सिद्धतेचे पुरावे नसणे, जातीचा सबळ पुरावा नसणे. नाते सिद्ध न करणे, प्रमाणित प्रती न देणे.
जिल्हा...............................प्रमाणपत्रांची संख्या
छत्रपती संभाजीनगर...................२०३६७
जालना...................................१५३३४
परभणी...................................१३६५७
हिंगोली..................................९५७१
नांदेड....................................४४६१
बीड......................................१७५७९६
लातूर...................................२३१५
धाराशिव..............................१५००४
एकूण.................................२५६५०५