हैदराबाद गॅझेटचा मराठा समाजाला फायदा होणार, मनोज जरांगे पाटील यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 11:06 IST2025-09-04T11:05:56+5:302025-09-04T11:06:32+5:30
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या निर्णयावर समाजातील अभ्यासकांकडून टीका करण्यात येत आहे. त्याविषयी जरांगे म्हणाले, शासन निर्णयामुळे मराठवाड्यातील सरसकट मराठ्यांना फायदा होणार आहे...

हैदराबाद गॅझेटचा मराठा समाजाला फायदा होणार, मनोज जरांगे पाटील यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने हैदराबाद गॅझिटिअर लागू करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे मराठवाड्यातील आणि सातारा, औंध संस्थानचे गॅझेटिअर लागू केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना फायदा होणार असल्याचे स्पष्टीकरण मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहे. ते छत्रपती संभाजीनगरातील खाजगी हॉस्पिटलमधून माध्यमांशी बोलत होते.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या निर्णयावर समाजातील अभ्यासकांकडून टीका करण्यात येत आहे. त्याविषयी जरांगे म्हणाले, शासन निर्णयामुळे मराठवाड्यातील सरसकट मराठ्यांना फायदा होणार आहे. मराठ्यांचा थेट ओबीसीत समावेश झालेला नसला तरी थोडे थोडे खाल्ले तर काय बिघडले? शासन निर्णय जर चुकीचा असता तर छगन भुजबळ यांच्यासह इतरांनी एवढा विरोध कशाला केला असता? छगन भुजबळ मंत्रिमंडळाच्या बैठकीतून निघून गेले नसते. या निर्णयामुळे मराठा ओबीसीमध्ये समाविष्ट झाला आहे. कोणाच्या दाव्यावर विश्वास ठेवू नका.
काहींच्या दुकानदाऱ्या बंद झाल्यामुळे पोटशूळ
मराठा समाजातील काही अभ्यासकांच्या दुकानदाऱ्या बंद झाल्यामुळे त्यांना पोटशूळ उठला आहे. ते चुकीच्या पद्धतीने मांडणी करीत आहेत. त्यांच्याकडे गरजवंत मराठ्यांनी लक्ष देऊ नये.
उपोषण सुरू झाले तेव्हाच समाजातील सगळ्या अभ्यासकांना बोलावले होते. जे आले नाहीत तेच आता बोलत आहेत. आतापर्यंत त्यांनी समाजासाठी काय केले, असा सवाल करीत मराठ्यांची डोके फुटण्याची त्यांना अपेक्षा होती.
ती अपेक्षा तर पूर्ण झालीच नाही. उलट जल्लोषात गेले आणि जीआर घेऊन जल्लोषात परतले. हेच खरे दुखणे आहे. त्यामुळे समाजाने अशांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन जरांगे यांनी केले.