मोबाईल कोणी दिला म्हणत संताप; चारित्र्याच्या संशय घेऊन पतीने केला पत्नीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 15:10 IST2025-05-24T15:06:52+5:302025-05-24T15:10:02+5:30
कन्नड तालुक्यातील घटना; परप्रांतीय पतीला अटक

मोबाईल कोणी दिला म्हणत संताप; चारित्र्याच्या संशय घेऊन पतीने केला पत्नीचा खून
पिशोर : पत्नीजवळ मोबाइल दिसल्याने तो कुणी दिला याचे उत्तर न दिल्याने पतीने चारित्र्याच्या संशयावरून रागाच्या भरात केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास कन्नड तालुक्यातील मोहंद्री शिवारात उघडकीस आली. पिंकाबाई संजय देवळे (वय २७, रा. बोरगाव, मध्य प्रदेश) असे मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पती संजय महिकाल देवळे याला अटक केली आहे.
मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बोरगाव येथील संजय व पिंकाबाई देवळे हे दाम्पत्य मोहंद्री शिवारातील अच्युतराव जाधव यांच्या शेतात काम करत होते. ते तेथीलच पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. मंगळवारी रात्री पती संजय याने पत्नी पिंकाबाईजवळ मोबाइल बघितला व सदरील मोबाइल तुला कुणी दिला, अशी विचारणा केली. पिंकाबाईने काही एक उत्तर न दिल्याने रागाच्या भरात त्याने मोबाइल चुलीत टाकून दिला. याचा राग आल्याने पती-पत्नीत जोरदार भांडण झाले. यावेळी पती संजय याने काठीने पत्नी पिंकाबाईला मारहाण करून तिचा गळा दाबला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी पती घरातच झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी अच्युतराव जाधव यांना या दाम्पत्याच्या वादाची माहिती देणारा फोन आल्याने ते शेतात गेले असता त्यांना पिकांबाई निपचीत पडल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी आरोपी संजय देवळे व इतर काही लोकांच्या मदतीने पिंकाबाईला पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. त्यानंतर केलेल्या उत्तरीय तपासणीत व पोलिस जमादार किरण गंडे, पोकॉ. व्ही.एस. भोटकर यांच्या पंचनाम्यात पिंकाबाई हिच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसून आले. त्यामुळे त्यांनी आरोपी पती संजय देवळे याची चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने काठीने अमानुषपणे मारहाण करून गळा दाबल्याने पिंकाबाईचा खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांंनी संजय देवळे याला ताब्यात घेतले. त्यानंतर अच्युतराव जाधव यांच्या फिर्यादीवरून संजय देवळे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक सत्यजीत फरताडे पुढील तपास करीत आहेत.
मृतदेह मध्य प्रदेशात पाठवला
दरम्यान, पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह मयतांच्या नातेवाइकांना सुपुर्द करण्यात आला. त्यानंतर अंत्यविधीसाठी मध्य प्रदेशातील मूळ गावी पाठविण्यात आला. दरम्यान घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, सपोनि शिवाजी नागवे यांनी भेट दिली.