पैठणगेटवरील शेकडो दुकाने भुईसपाट; छत्रपती संभाजीनगरातील सर्वात मोठे मोबाइल हब गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:48 IST2025-11-20T18:47:41+5:302025-11-20T18:48:44+5:30
अदृश्य झालेले रस्ते पाहून छत्रपती संभाजीनगर शहरवासीयांना आश्चर्य

पैठणगेटवरील शेकडो दुकाने भुईसपाट; छत्रपती संभाजीनगरातील सर्वात मोठे मोबाइल हब गायब
छत्रपती संभाजीनगर : महापालिका प्रशासनाने बुधवारी पैठणगेट, सब्जीमंडी परिसरातील मुख्य रस्ते मोकळे केले. दिवसभरात १०० पेक्षा अधिक दुकाने, निवासस्थानांचा अतिक्रमित भाग जेसीबी, पोकलेनच्या साह्याने पाडण्यात आला. सब्जीमंडी येथील ९ मीटर म्हणजेच जवळपास ३० फूट रुंद झालेला रस्ता पाहून शहरवासीयांनाही आश्चर्य वाटू लागले. कालपर्यंत या रस्त्यावरून रिक्षाही जात नव्हती. जुन्या शहरात महापालिकेने केलेली ही सर्वांत मोठी कारवाई होय.
१० नोव्हेंबरला रात्री १०:३० वाजता पैठणगेट येथील एका मोबाइल दुकानासमोर तरुणाची निर्दयी हत्या करण्यात आली होती. दुसऱ्याच दिवशी मृत तरुणाच्या समाजबांधवांनी मनपाच्या वॉर्ड कार्यालयात जाऊन पैठणगेट भागातील अतिक्रमणांवर बोट ठेवले. त्यानंतर महापालिका कारवाईसाठी सरसावली. अगोदर या भागातील रस्त्यांचा टोटल स्टेशन सर्व्हे करण्यात आला. मार्किंग देण्यात आली. बुधवारी सकाळी १० वाजता अतिक्रमण हटाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर मोठा फौजफाटा घेऊन पैठणगेट भागात दाखल झाले. मंगळवारपासून बहुतांश व्यापाऱ्यांनी आपले सामान काढून घेण्यास सुरुवात केली होती. महापालिकेच्या पथकाने अर्ध्या तासानंतर कारवाईला सुरुवात केली. ज्या ठिकाणी तरुणाचा खून झाला होता, ती दोन दुकाने अगोदर भुईसपाट करण्यात आली. त्यानंतर एकानंतर एक अतिक्रमणांवर हातोडा पडत गेला. दुपारी १:३० वाजेपर्यंत तर बहुतांश दुकानांचे दर्शनी भाग पाडण्यात आले. सायंकाळपर्यंत लोखंडी पत्रे, मलबा हटविण्याचे काम मनपाच्या यंत्रसामग्रीने करण्यात येत होते.
मोबाइल हब गायब
पैठणगेट येथील मनपा पार्किंगच्या डाव्या बाजूला नावाजलेले एक ज्यूस सेंटर होते, त्यावरही बुलडोजर फिरवण्यात आले. त्याच्याच शेजारी विविध पक्षी विक्री करणाऱ्यांचे दुकान होते, हे दुकानदेखील पाडण्यात आले. पैठणगेटची अलीकडे मोबाइल हब अशी ओळख निर्माण झाली होती. मोबाइल विक्री, दुरुस्तीची दुकाने या भागात मोठ्या प्रमाणात होती. या कारवाईनंतर मोबाइल हब गायब झाला.
तीन मजली इमारत
पैठणगेट पार्किंगच्या उजव्या बाजूला ३ मजली इमारत होती. मोठ्या पोकलेनच्या साह्याने या इमारतीचा दर्शनी भाग पाडण्यात आला. मालमत्ताधारकाने मार्किंगनुसार जागा मोकळी करून देण्याचे आश्वासन दिल्यावर मनपाने वेळ दिला. दलालवाडीमार्गे खोकडपुऱ्याकडे जाणारा सब्जी मंडईचा रस्तादेखील मोकळा करण्यात आला. हा रस्ता विकास आराखड्यानुसार १२ मीटर रुंदीचा आहे.