ऑफरमुळे छ. संभाजीनगरमधील कपड्यांच्या दुकानात चेंगराचेंगरी; पोलिसांमुळे अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 14:00 IST2026-01-05T13:59:53+5:302026-01-05T14:00:33+5:30
कपड्यांच्या दुकानात चेंगराचेंगरी; पोलिसांना बंद करावं लागलं शटर

ऑफरमुळे छ. संभाजीनगरमधील कपड्यांच्या दुकानात चेंगराचेंगरी; पोलिसांमुळे अनर्थ टळला
छत्रपती संभाजीनगर : कोणतेही सुरक्षा उपाय न करता कपड्यांच्या खरेदीवर आकर्षक सूट देण्यात आली. खरेदीला येण्याचे आवाहन एका दुकानदारास चांगलेच महागात पडले आहे. उद्घाटनानंतर काही वेळात शेकडो महिलांसह पुरुष खरेदीसाठी एकाच वेळी दुकानात दाखल झाले. त्यामुळे चेंगराचेगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यात तीन महिला गुदमरल्यामुळे चक्कर आली. अखेर दुकानाचे शटर बंद करून पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. ही घटना अकाशवाणी परिसरातील फ्रिडम टॉवरमध्ये नव्यानेच सुरू झालेल्या एका दुकानात रविवारी (दि.४) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
आकाशवाणी परिसरात नव्यानेच टेंज द फॅशन वर्ल्ड हे कपड्याचे दुकान रविवारी सुरू झाले. या दुकानाचे उद्घाटन करण्यापूर्वीच सोशल मीडियात विविध रिल्सच्या माध्यमातून किरकोळ दरात कपड्याची विक्री होणार अशी जाहिरात केली होती. या आकर्षक जाहिरातीला भुलून वाशिम, जालना, परभणी, नांदेडसह इतर जिल्ह्यासह शहरातून शेकडो महिलांनी रविवारी सकाळीच फ्रिडम टॉवर्सच्या परिसरात गर्दी केली.
दुकानात जाण्यासाठी एकच शटर असून, आतमध्ये मोठ्या संख्येने नागरिक गेल्यामुळे उभे राहण्यासही जागा नव्हती. त्याशिवाय नागरिकांनी दुकानात गेल्यानंतर प्रत्येक वस्तू उचलून घेतल्यामुळे एकच गोंधळ उडाला. चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. दुकानातील गर्दीपेक्षा बाहेर अधिक नागरिक जमले होते. त्याचवेळी दुकानाच्या परिसरातून ११२ ला फोन करण्यात आल्यामुळे पोलिसांची गाडी दाखल झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांनी अधिकची कुमक पाठविली. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळविले. चक्कर आलेल्या महिलांना सुखरूप बाहेर काढले. दुकान बंद केले जाणार असल्याची घोषणा मालकानेच पोलिसांच्या स्पिकरवरून केली. तरीही नागरिक परिसरात तळ ठोकून होते.
पोलिसांची परवानगी घेतली
महाराष्ट्रभरात आमच्या दुकानाच्या शाखा उघडण्यात येत आहेत. शहरातील शाखेचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. त्यासाठी २० हजार नागरिक येतील, असा अंदाज होता. त्यासाठी पोलिसांनाही कळवून परवानगी घेतली होती.
- कृष्णा देशमुख, दुकान मालक
पोलिसांना माहितीच नाही
आमच्या हद्दीत अशा दुकानाचे उद्घाटन होणार आहे आणि त्यासाठी २० हजार लोक येणार आहेत. त्याविषयीची माहितीच नव्हती. २० हजारांचा जमाव येणार असेल तर बंदोबस्त अगोदरच लावला असता. मात्र, ऐनवेळी पोलिसांना कळविले. तरीही पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
- सचिन कुंभार, पाेलिस निरीक्षक, जवाहरनगर ठाणे.