विद्यादीप बालगृहातून मुलींच्या पळण्याचा कट एकीच्या मित्राला कळला कसा? वाट पाहत होता उभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 19:15 IST2025-07-02T19:08:23+5:302025-07-02T19:15:02+5:30

बालगृहातच कॉलसाठी मोबाइल पुरवला जात असल्याचा मुलींचा गंभीर आरोप; एका मुलीचा मित्र बालगृहापासून काही अंतरावर उभा होता

How did Eki's friend find out about the girls' escape from Vidyadeep orphanage? He was waiting. | विद्यादीप बालगृहातून मुलींच्या पळण्याचा कट एकीच्या मित्राला कळला कसा? वाट पाहत होता उभा

विद्यादीप बालगृहातून मुलींच्या पळण्याचा कट एकीच्या मित्राला कळला कसा? वाट पाहत होता उभा

छत्रपती संभाजीनगर : विद्यादीप बालगृहात आश्रयास असलेल्या ९ अल्पवयीन मुलींनी हातावर काचा मारून घेत पलायन केले. सोमवारी घडलेल्या या घटनेत मुली पळणार असल्याची ९ पैकी एका मुलीच्या मित्राला पूर्वकल्पना होती. त्या पळाल्यानंतर तो काही अंतरावरच उभा होता. त्यामुळे बालगृहात मोबाइलवर बंदी असताना, त्याला ही बाब कळली कशी, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे. दरम्यान, बालगृहातीलच एक महिला कर्मचारी मोबाइल पुरवत होती, असा दावा पळालेल्या मुलींपैकी एकीने केला आहे.

विविध कारणांमुळे घर सोडलेल्या, गुन्ह्यातील पीडितांना, अनाथ मुलींना छावणीच्या या विद्यादीप बालगृहात ठेवले जाते. महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या बालगृहात ८९ मुली आश्रयास होत्या. गेल्या काही महिन्यांमध्ये विविध कारणास्तव दाखल ९ मुली मात्र सोमवारी आक्रमक झाल्या. त्यांनी बल्ब, ट्यूबलाइट फोडून हातावर वार करीत आरडाओरड केली. पाना, चाकू, रॉड घेऊन त्यांनी सुरक्षा भिंतीवरून उडी मारत पलायन केले. या घटनेमुळे पोलिस विभाग चांगलाच हादरून गेला. दुपारपर्यंत ७ मुली ताब्यात घेतल्या, तर १४ वर्षांच्या मुलीने स्वत:चे घरच गाठले. तिच्या आईसह ती मंगळवारी बाल कल्याण समितीसमोर हजर झाली. नवव्या मुलीचा शोध पोलिस घेत होते.

मुलींच्या आरोपांची चौकशी होणार
पळालेल्या मुलींपैकी एका मुलीचा मित्र नगरनाका परिसरात उभा होता. मात्र, मुलींच्या मागे नागरिक, पोलिस असल्याचे पाहून तो निसटला. बालगृहात मुलींना मोबाइल वापरण्यास बंदी आहे. तरीही मुलीच्या मित्राला ती पळणार असल्याची माहिती कशी कळाली, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवाय, मुलींनी बालगृहावर विशिष्ट धर्माच्या चालीरीती पाळण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडितांपेक्षा आरोपींसारखी वागणूक दिली जात असल्याची बाब मुलींनी वारंवार अधोरेखित केली.

मुली एक शब्दही बोलायला तयार नाहीत
सोमवारच्या घटनेनंतर बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. आशा शेरखाने-कटके यांनी सदस्यांसह विद्यादीप बालगृह गाठले. जवळपास ५ तास त्यांनी ८० मुलींना बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकिनेही तक्रार केली नाही. तरीही घडलेल्या घटनेचा, मुलींच्या आरोपांचा सविस्तर अहवाल पुण्याच्या महिला व बाल विकास आयुक्तांना पाठवणार असल्याचे शेरखाने यांनी स्पष्ट केले.

‘त्या मुली’चा पहाटे पुन्हा धिंगाणा
नऊ मुलींपैकी १६ वर्षीय रिहाना पसार झाल्यानंतर, रात्री १४ वर्षीय रिनाच्याच (दोन्ही नाव बदलेलेले आहे) घरी मुक्कामी राहिली. पहाटे ५ वाजता उठून रिहानाने रिनाच्या घरी धिंगाणा घालत तिच्या आईला, पण धमकावत घर सोडले. पोलिस तिचा मंगळवारी दिवसभर शाेध घेत होते.

Web Title: How did Eki's friend find out about the girls' escape from Vidyadeep orphanage? He was waiting.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.